कोल्हापूर - 'आपलं ठरलंय' हे वाक्य गेल्या महिन्याभरापासून अनेकांच्या तोंडामध्ये ऐकायला मिळत होतं. आता तर या वाक्यावर रिंगटोनच बनली आहे. याच गाण्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आज (१२ एप्रिल) जिल्ह्यात या गाण्याची दिवसभर क्रेझ पाहायला मिळाली.
एका राजकीय नेत्याच्या वाढदिवसानिमित्त दुसऱ्या एका नेत्याला हिनवण्यासाठी ही रिंगटोन तयार करण्यात आल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
कोल्हापूरात 'आपलं ठरलंय' रिंगटोनची धूम कोल्हापूर लोकसभेचे राजकारण ज्या दोन राजकीय नेत्यांच्या भोवती फिरत आहे, त्यांपैकी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी वाढदिवसानिमित्त केलेल्या जाहिरात बाजीत 'आमचं ठरलंय'हे वाक्य उठावदर्शकपणे मांडले आहे. शिवाय आमदार सतेज पाटील यांनीसुद्धा आपल्या भाषणांमधून सातत्याने या वाक्याचा उल्लेख करून आपला इरादा स्पष्ट केला आहे.
कोल्हापूरात 'आपलं ठरलंय' रिंगटोनची धूम आज सकाळी या जाहिराती जिल्ह्यात झळकताच दुसरीकडे हे गाणेही तयार होऊन व्हायरल झाले. या गाण्यात शिवसेनेच्या गीताचे संगीत मिक्स असल्याने हे गाणे नेमके काय ठरले आहे, ते स्पष्टपणे दर्शवणारे आहे. खासदार धनंजय महाडिक यांना विरोध म्हणून आमदार सतेज पाटील त्यांच्या विरोधातील शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारात उतरले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात या गाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
कोल्हापूरात 'आपलं ठरलंय' रिंगटोनची धूम 'आपलं ठरलंय' फक्त गाण्यांमध्येच नाही तर, 'आमचं ठरलंय कमान आणि बोर्ड, आमचं ठरलंय टोप्या, आपलं ठरलंय स्टिकर गाजत आहे. सतेज पाटील आणि धनंजय महाडिक या दोघांतील वाद मिटवण्याचे वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनाही शक्य झाले नाही. काँग्रेस पक्षाकडूनही सतेज पाटील यांना याची विचारणा झाली नसल्याने सतेज पाटलांना रान मोकळे झाले आहे. आज सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तसुद्धा सतेज पाटील यांनी गुलालच माझ्यासाठी शुभेच्छा, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे या गाण्याचा आवाज आता आणखी वाढताना दिसत आहे.