कोल्हापूर - कोल्हापुरातल्या प्रयाग चिखली येथे जवळपास 2 एकर क्षेत्रातील ऊसाला काल रात्री आग लागली. मात्र, गावातील एका गुर्हाळ घरातील कामगारांसह गावातील शंभरहून अधिक तरुणांनी मिळून ऊसाच्या फडा शेजारीच असलेल्या शेकडो एकर क्षेत्रातील ऊसाला आग लागण्यापासून वाचवले आहे.
प्रयाग चिखली गावातील सरनाईक पाणंद कळके मळ्यामध्ये असलेल्या 3 शेतकऱ्यांच्या ऊसाच्या फडाला भीषण आग लागली. मात्र, शेतकऱ्यांनीच एकी दाखवून मोठे नुकसान टाळले. यामध्ये दुर्दैवाने राजेंद्र कुरणे, कृष्णात जाधव आणि सर्जेराव जाधव या तीन शेतकऱ्यांच्या सुमारे 2 एकर क्षेत्रातील ऊसाच्या फडाला आग लागून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांच्या ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान कोल्हापुरातल्या करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली गावातील एका शेतकऱ्याच्या ऊसाला आग लागली. हे जवळच असलेल्या एका गुर्हाळ घरातील कामगारांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ त्या ठिकाणी धाव घेत ऊस विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, आगीची तीव्रता पाहून काहींनी गावातील तरुणांना माहिती दिली. त्यानंतर तत्काळ शेकडो तरुणांनी धाव घेऊन शक्य त्या पद्धतीने ऊस विझविण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये तीन शेतकऱ्यांच्या ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, शेजारीच असलेला शेकडो एकर ऊस तरुणांच्या प्रयत्नांमुळे वाचला आहे.
उसाच्या फडाला आग लागण्याच्या अनेक घटना
कोल्हापूर जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. दरवर्षी उसाच्या फडाला आग लागण्याच्या अनेक घटना घडतात. नुकतेच आजरा तालुक्यातसुद्धा एका ठिकाणी 40 एकर क्षेत्रातील उसाच्या फडाला आग लागल्याची घटना ताजी असताना काल रात्री चिखलीमध्येही आग लागल्याची घटना घडली. काही ठिकाणी विजेच्या तारांमुळे आग लागल्याचे शेतकरी सांगतात, तर काही ठिकाणी पाला पेटवल्यामुळे बाजूच्या फडाला आग लागल्याने घटना घडल्याचे समजले. गेल्याच आठवड्यात एका शेतकऱ्याचा आग विझविताना मृत्यूसुद्धा झाला आहे. त्यामुळे, अशा घटना टाळण्यासाठी उपायोजना करणे गरजेचे आहे.
हेही वाचा - शिवजयंतीनिमित्त पन्हाळागडावर 400 झाडे लावून अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले 'हे' आवाहन..