कोल्हापूर - धुण्या भांड्याचे काम करण्यासाठी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसडा मारून लंपास केल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापूरातल्या महाडिक वसाहत-रुईकर कॉलनी परिसरात हा प्रकार घडला आहे. इंदूबाई बाळासाहेब समुद्रे (वय 50, रा. विक्रमनगर, कोल्हापूर) असे तक्रार दाखल केलेल्या महिलेचे नाव आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
केटीएम दुचाकीवरून आले होते चोरटे -
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी 9 च्या सुमारास इंदूबाई बाळासाहेब समुद्रे आणखी एका महिलेसोबत धुण्या भांड्याच्या कामासाठी जात होत्या. अचानकच एका केटीएम दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी महिलेच्या शेजारी दुचाकी नेली आणि महिलेच्या गळ्यातील दागिन्याला जोरदार हिसडा मारून ते तेथून पसार झाले. महिलेने आरडा ओरडा करून आजूबाजूच्या नागरिकांना बोलविण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. हा संपूर्ण प्रकार येथील एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. संबंधित महिलेने या घटनेची पोलिसांना देऊन तक्रार दाखल केली असून पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत.