कोल्हापूर : संपुर्ण भारतात चंदेरीनगरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या हुपरी शहरात सध्या वेगळीच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे येथील गायीच्या डोहाळे जेवणाची. हुपरी येथे राहणारे किसन माने या शेतकऱ्याने गायीवर असलेल्या प्रेमापोटी चक्क डोहाळे जेवणाचा आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम केला आहे. गौरी असे या गायीचे नाव असून ती सद्या तीन वर्षांची आहे. तिच्या या डोहाळे जेवणाला व ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला गावातील शेकडो महीला उपस्थित आल्या होत्या याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.
अगदी लहान बाळाप्रमाणे संगोपन : कोल्हापुरातील हुपरी या गावात राहणारे किसन माने हे शेतकरी असून त्यांची वडिलोपार्जित शेती आहे. त्यांना गो पालनाचीही आवड असल्याने ते गायी ही पाळतात. इतर गायी सोबतच त्यांच्याकडे गौरी नावाची ही गाय आहे. गौरी अगदी 15 दिवसाची असताना माने यांनी तिला घरात आणले. अगदी लहान बाळाप्रमाणे तिचे संगोपन केले. अगदी गौरीला बाटलीमधून दूध पाजले. दिवसेंदिवस गौरीशी माने कुटुंबीयांची नाळ घट्ट होत गेली.
गौरीचे औक्षण करत ओटीही भरली : आज ही गौरी गाय तीन वर्षांची झाली असून ती नऊ महिन्याची गर्भवती आहे. त्यामुळे माने यांनी अगदी आपल्या मुली प्रमाणे असलेल्या गौरी गायीचे डोहाळे जेवण आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम मोठा करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे त्यांनी आपले मित्र,पै-पाहुणे आणि गल्लीतील अनेकांना त्यांनी आमंत्रण दिले. गायीचे डोहाळे जेवण असल्याने उत्साहाने सर्वजण महिला जमल्या. महिलांनी गौरीचे औक्षण करत ओटीही भरली आणि आशिर्वादही घेतला. तिला यावेळी सुंदर सजवण्यात आले. दारात गायीची रांगोळी ही काढली आणि मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. माने कुटुंबियांनी या कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येकासाठी स्नेहभोजणाचीही व्यवस्था केली होती. गायीची ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला शेकडो महिला पुरुष उपस्थित होते. तर अनेक जण या कार्यक्रमाचे आणि माने कुटुंबीयांचे कौतुक करत होते. तर या कार्यक्रमाची चर्चा सध्या पंचक्रोशीत सुरू आहे.