कोल्हापूर: कोल्हापूरात जिल्ह्यात बंदी आदेश जारी करण्यात आला आहे. 9 डिसेंबर पासून 23 डिसेंबर रात्री 12 पर्यंत हा बंदी आदेश लागू असणार आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश जारी करण्यात आला आहे. शनिवारी महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक तसेच सीमाभागातील लोकं जमा होण्याची शक्यता असल्याने जमावबंदी आदेश जारी करण्यात आला आहे.
कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण: शनिवारी 10 डिसेंबर रोजी महाविकास आघाडीने कोल्हापूरात भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चामध्ये कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन बंदी आदेश काढला आहे. ज्यामध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी आहे. ग्रामपंचायत निवडणुका, सीमावाद आदींच्या पार्श्वभूमीवर बंदी आदेश असून हा आदेश सण, यात्रा, उत्सव, लग्नसमारंभ, धार्मिक समारंभ आदीसाठी लागू नसणार आहे.
याबाबतचा आदेश आज जारी: शिवाय कोणत्याही पद्धतीची वाहतूक व्यवस्था बंद नसणार आहे. केवळ मोर्चा, आंदोलन, राजकीय सभा आदींना बंदी असणार आहे. अप्पर जिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी याबाबतचा आदेश आज गुरुवार रात्री उशिरा जारी केला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. त्यामुळे पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी असणार आहे.