कोल्हापूर - जनावरांना ही भावना असतात हे अनेकदा समोर येते. नुकतंच कोल्हापुरातील एका जखमी गाईच्या वासराला उपचारासाठी टेम्पोमधून घेऊन जाताना त्या टेम्पोमागे गाय सुद्धा धावत जात असल्याची घटना पाहण्यात आली. अशीच काहीशी मन हेलावणारी घटना आता कोल्हापुरातल्या नूल गावात घडली आहे. येथील 'लक्ष्या' या एका बैलाच्या मृत्यूनंतर त्याचा जोडीदार असलेल्या 'शंकऱ्या'चे डोळे पाणावले. या दोन्ही बैलांचे नाते पाहून बैलांच्या मालकासह गावकऱ्यांनीही हळहळ व्यक्त केली.
कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेलगत असणाऱ्या गावातील भिमाप्पा मास्तोळी हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांच्याकडे लक्ष्या आणि शंकऱ्या ही बैलजोडी खूप वर्षांपासून होती. सुदृढ आणि देखण्या अशा लक्ष्या आणि शंकऱ्याला शेतकऱ्यांकडून खूप मोठी मागणी होती पण भिमाप्पांनी त्यांना न विकता या बैलांच्या जीवावर आपला सगळा संसार उभा केला. तब्बल दीड लाख रुपयाला ही बैलं मागून सुद्धा भिमाप्पांनी ती विकली नाहीत.
गेल्या आठवड्यात अचानक लक्ष्याला विषबाधा झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण मास्तोळी कुटुंबावर दुःखाचे मोठे आभाळ कोसळले. मास्तोळी कुटुंबाबरोबर लक्ष्याचा खूप वर्षापासून साथीदार असणाऱ्या शंकऱ्याचेही डोळे पाणावले. शंकऱ्याने तीन दिवस चाऱ्याला तोंडही लावले नाही. त्याची अवस्था बघून मास्तोळी कुटुंब आणि नूल मधल्या नागरिकांनाही या दोघांचे नाते किती घट्ट होते हे समजले. त्यामुळे सर्वांचाच अश्रूंचा बांध फुटला. निर्दयी माणसांना सर्वत्र जनावरांची उपमा दिली जाते, पण मुक्या जनावरांनाही भावना असतात हे या घटनेवरून दिसून येत आहे.