कोल्हापूर - कोल्हापूरकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी गुरुवारी सायंकाळी सीपीआरमधून मिळाली आहे. कोरोनावर उपचार घेत असलेल्या 4 रुग्णांना सायंकाळी सीपीआरमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. चारही रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना कोरोनामुक्त घोषित करण्यात आले होते. गुरुवारी सायंकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
सीपीआरमधून यापूर्वी 4 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गुरुवारी डिस्चार्ज मिळालेल्या 4 जणांना मिळून एकूण 8 जणांवर आत्तापर्यंत यशस्वी उपचार झाले असून त्यांना डिस्चार्ज दिला आहे, तर इचलकरंजी येथील एका वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज डिस्चार्ज दिलेल्यांमध्ये कसबा बावडा येथील महिला, उचतमधील महिला आणि कंटेनरमधून प्रवास करताना सापडलेले दोन रुग्ण अशा चौघांचा समावेश आहे. ज्या 4 रुग्णांवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, त्यामध्ये कनाननगर येथील तरुण, इचलकरंजी येथील 72 वर्षीय वृद्ध, रत्नागिरीहून बंगळूरूला जात असलेला तरुण आणि भुदरगडमधील एक रुग्ण अशा चौघांचा समावेश आहे. यातील दोघांची प्रकृती गंभीर असून दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सीपीआर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. लवकरच उरलेले रुग्ण सुद्धा कोरोनामुक्त होतील, असा विश्वास सुद्धा डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.