कोल्हापूर - पेठ वडगावमधील महालक्ष्मी क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या कार्यालयात सुरु असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून 39 जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत मोठ्या रोख रक्कमेसह 7 मोटर सायकली आणि जुगाराचे साहित्य, टीव्ही, डिव्हीआर असा 4 लाख 96 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पेठ वडगाव पोलीस ठाण्याचे प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक धीरजकुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.
हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव येथील महालक्ष्मी क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कार्यालयात नवीन वर्षाच्या निमित्ताने जुगाराचा मोठा डाव रंगणार असल्याची माहिती पेठ वडगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथक तयार करून रात्री याठिकाणी पोलिसांनी छापा टाकून जवळपास 39 जणांना ताब्यात घेतले. खेळणाऱ्यांकडून दीड लाख रुपये रोख, मोबाईल आणि 7 मोटरसायकली तसेच पत्ते खेळण्याचे साहित्य टेबल खुर्च्या, काँईन, पत्यांचे बाँक्स, 3 टीव्ही, डीव्हीआर, असा 4 लाख 96 हजाराचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला.
वडगाव शहरात मोठी कारवाई करण्यात आल्यामुळे सर्वत्र एकच चर्चेचा विषय बनला आहे. शिवाय घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. जुगार खेळताना ताब्यात घेतलेले सर्व वडगाव, हातकणंगले, इचलकरंजीसह सांगली आणि इस्लामपूर परिसरातील आहेत. प्रशिक्षणार्थी उपअधिक्षक धीरज कुमार बच्चू यांच्यासोबत वडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नसिर खान, किशोर पवार, विकास घस्ते, रणवीर जाधव, जितेंद्र पाटील, नरसिंग कुंभार, अशोक जाधव, रामराव पाटील, अमरसिंह पावरा, यांचा कारवाईत सहभाग होता.
हेही वाचा - गडहिंग्लज : ७५ वर्षीय आजीबाई ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात
हेही वाचा - अंबाबाईच्या मुखदर्शनासाठी मंदिराचा पश्चिम दरवाजा उघडला