कोल्हापूर - कोल्हापुरात जवळपास 30 एकर क्षेत्रातील ऊसाला आग लागल्याची घटना घडली आहे. दुपारच्या सुमारास लागलेल्या या आगीत अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले गावामध्ये ही घटना घडली आहे. जवळपास 50 लाखांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. नेमकी ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापही कळू शकले नाही. मात्र या आगीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
- 50 हून अधिक शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस जळून खाक
पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले गावात असलेल्या शिवची पाणंद, झेलू माळ आणि मळी नावाच्या शिवारात ऊसाच्या फडाला आज दुपारी तीनच्या सुमारास आग लागली. अनेक शेतकऱ्यांनी आगीची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न केले. मात्र वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आगीने काही क्षणात रौद्र रूप धारण केले आणि या परिसरातील ऊस जळून खाक झाला. काही प्रमाणात ऊस वाचविण्यात त्यांना यश सुद्धा आले. मात्र मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 30 एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. जवळपास 50 लाखांचे नुकसान झाले आहे. दरम्यान दत्त दालमिया साखर कारखान्याचे संग्राम पाटील, श्रीकांत पाटील, राजाराम पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन आग लागलेल्या शेताची पाहणी केली.
- 'या' शेतकऱ्यांचे झाले नुकसान
लागलेल्या या आगीमध्ये लहान मोठ्या अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यामध्ये धोंडीराम म्हामणे, शिवाजी म्हामणे, महादेव म्हामणे, श्रीकांत म्हामणे, विलास शेलार, अनंत पाटील, संजय उत्रेकर, भीमराव जाधव, सुरेश जाधव, अभिजीत शिर्के, एस.आर.पाटील, विठ्ठल पाटील, विश्वास पाटील, पांडूरंग पाटील, विलास पाटील, अक्षय पाटील, शांताबाई पाटील, आदींचे नुकसान झाले. दरम्यान, आगीत वाचलेला ऊस कारखान्याने त्वरित न्यावा अशी,, मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा - Accident on Daryapur Anjangaon Road : दर्यापूर-अंजनगाव मार्गावर कारचा भीषण अपघात, तरुणीचा जागीच मृत्यू