कोल्हापूर - गेल्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्याला आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या आस्मानी संकटाला सामोरे जावे लागले. गेल्या वर्षी आलेल्या महापूराने होत्याचे नव्हते झाले, हजारो संसार उद्धस्व झाले. २०१९ च्या ऑगस्ट महिन्यातील ते 15 दिवस कोल्हापूरातील नागरिक कधीही विसरू शकणार नाही. त्या संकटाच्या जखमा इतक्या खोलवर आहेत की अनेकांच्या मनात आयुष्यभर त्या तशाच ताज्या राहणार आहेत. कोल्हापूरसह राज्यभरातील लोकांनी केलेल्या निस्वार्थी मदतीमुळे कोल्हापूर त्या संकटातून पुन्हा उभे राहिले. महाप्रलयावेळी काय होती परिस्थिती? कशा पद्धतीने पाणी पातळी वाढत गेली? यावर ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी शेखर पाटील यांचा हा स्पेशल रिपोर्ट...
31 जुलै 2019 -
सलग 2 दिवस कोल्हापुरात मुसळधार पाऊस झाला. राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी 41 फुटांवर पोहोचली तर जिल्ह्यातील 80 बंधारे पाण्याखाली गेले. राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले. सांगली-कोल्हापूर बायपासवरती उदगाव ओढ्यावरील पुलावर पाणी आल्याने सांगलीकडे जाणारा बायपास रोड बंद झाला.
1 ऑगस्ट 2019 -
पंचगंगा नदी पाणीपातळीची धोकादायक स्थितीत. सकाळी 7 वाजता पाणी पातळी 41.8 फूट झाली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील सुतार वाडा भागातील 5 कुटुंब आणि 18 लोकांना खबरदारी म्हणून मुस्लिम बोर्डिंगमध्ये स्थलांतरित करण्यात आले. कसबाबावडा शिये रोडवर 1 फूट पाणी साचल्याने रस्ता बंद झाला. दुपारी 1 वाजता 2 इंच पाणीपातळी वाढली त्यामुळे आणखी 4 कुटुंबे आणि 23 लोकांना चित्रदुर्ग मठामध्ये स्थलांतरीत करण्यात आले. बालींगा पूलावरून वाहतूक बंद झाली. रात्री उशिरा राजाराम बंधाऱयाची पाणीपातळी 42.2 फुटांवर गेली. तोपर्यंत जिल्ह्यातील 83 बंधारे पाण्याखाली गेले होते. पावसाचा जोर किंचित ओसरला व राधानगरी धरणाचे उघडलेले 4 पैकी 2 दरवाजे बंद झाले. दरम्यान, हातकणंगले तालुक्यातील काही कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले.
हेही वाचा - 'ETV भारत'च्या कॅमेऱ्यातून...कोल्हापुरातील महाप्रलयाच्या पाऊलखुणा
2 ऑगस्ट 2019 -
सकाळी 9 वाजता राजाराम बंधाऱयाची पाणी पातळी 42.9 फूटांवर पोहोचली. पुढच्या एका तासातच पंचगंगा नदीने धोक्याची पातळी (43 फूट) गाठली. मुसळधार पाऊस सुरूच होता. करवीर, बावडा, इचलकरंजी, कुरुंडवाड आणि इतर नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या गेल्या. दुपारी 2 वाजता हळदी येथे पुराचे पाणी आल्याने कोल्हापूर-राधानगरी रस्ता बंद. 4 वाजता जिल्ह्यातील 9 वाहतूक मार्ग बंद. 4 वाजता राधानगरी धरणाचे पुन्हा 3 आणि 6 नंबरचे हे दोन दरवाजे उघडले गेले. चार दरवाजांमधून 7 हजार 112 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला. रात्री 8 वाजता नदीची पाणी पातळी 43.4 फूट झाली. जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील शाळांना सुट्टी देण्याचे जिल्हाधिकाऱयांनी आदेश दिले. जिल्ह्यात 300 प्रशिक्षित 'आपदा मित्र' आपत्ती साधनसामुग्रीसह सज्ज ठेवण्यात आले. रात्री 10 वाजता शनिवार पेठयेथील बुरुड गल्लीत घराची भिंत पडली. आतमध्ये अडकलेल्या दोघांना अग्निशमन दलाच्या पथकाने सुखरूप बाहेर काढले. रात्री 10 वाजता शिवाजी पूल, राजाराम बंधारा व कसबाबावडा येथे शंभर मीटर परिसरात प्रवेश बंदी करण्यात आली. 11:30 वाजता नदीची पाणी पातळी 43.6 फुटांवर. शाहूपुरीमधील कुंभार गल्ली ओढ्या लगतच्या भागात पाणी घुसण्यास सुरुवात.
3 ऑगस्ट 2019 -
रात्री 12 वाजता कोल्हापूर-पन्हाळा रोडवरील रेडेडोह फुटला. सकाळी 8 वाजता 43.9 नदीची पाणी पातळी फुटांवर गेली. 81 बंधारे पाण्याखाली होते. हळदी गावामध्ये पुराचे पाणी घुसले. दुपारी 2 वाजता नदीची पाणी पातळी 44 फुटांवर गेली. आतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 19 एसटी मार्ग बंद झाले. पन्हाळा तालुक्यातील बादेवाडी गावात डोंगराच्या बाजूला भेगापडून काही भाग खचला. पायथ्यालाच असणाऱ्या 14 घरांतील लोकांना सुरक्षितस्थळी हलवले. सलग 4 ते 5 तास ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. रात्री 10 वाजेपर्यंत जिल्ह्यातील 289 कुटुंबातील 1 हजार 16 व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलवले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी विस्थापितांसाठी राहण्याची व खाण्याची प्रशासनाने सोय केली. यात कोल्हापूरकरांनी मोठ्या प्रमाणात मदत केली. रात्री 10 वाजता कोल्हापूरातील कुंभार गल्लीत पूर्णपणे पाणी शिरले. रात्री 11 वाजता नदीची पाणी पातळी 44.5 फुटांवर गेली.
4 ऑगस्ट 2019 -
सकाळी 10 वाजता नदीची पाणीपातळी 45.1 फुटांवर. दुपारी 1 वाजता व्हीनस कॉर्नर येथील अप्सरा चित्रमंदिरामध्ये पुराचे पाणी शिरले, सर्व शो बंद केले गेले. गगनबावडा-कोल्हापूर रस्ता गगनबावडा व दोनवडे या दोन्ही ठिकाणी बंद झाला. जयसिंगपूरमधील अंकली टोल नाक्याजवळ कंटेनर ओढ्यात बुडाला. राधानगरी धरणातून साडे सात हजार क्यूसेकचा विसर्ग सुरू होता. नदीकाठच्या लोकांना पुन्हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला. दुपारी 3 वाजता रुकडी हातकणंगले दरम्यान पाणी आल्याने मिरज ते कोल्हापूर रेल्वे सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद झाली. खोची येथील नदीकाठच्या घरांचे स्थलांतर झाले. शाहूवाडीमधील करंजफेन बाजारपेठमध्ये पाणी शिरले. सायंकाळी 6 वाजता ऐतिहासिक पन्हाळागडावर जाणारा मुख्य रस्ता खचल्याने पन्हाळागडाशी संपर्क तुटला. पूर पाहण्यासाठी गर्दी होत असल्याने बालिंगा पूल परिसरात जमाव बंदीचे आदेश 144 लागू केले गेले. साायंकाळी 6 वाजता नदीची पाणी पातळी 45.6 फुटांवर तर 93 बंधारे पाण्याखाली गेले. इचलकरंजी येथे अनेक कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले. रात्री 8 पर्यंत जिल्ह्यातील 958 कुटुंबातील 3 हजार 930 नागरिकांचे स्थलांतर. रात्री 8 वाजता राधानगरी धरणाचे पाचवा दरवाजा उघडून 9 हजार 968 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला. रात्री 8:30 वाजता जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. 8.45 वाजता राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडले, 11 हजार 400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला. खानविलकर पेट्रोल पंप येथील जयंती पुलावर पाणी आले. रात्री 11 वाजता पाणी पंचगंगेची पाणी पातळी 46.1 फुटांवर पोहोचली.
5 ऑगस्ट 2019 -
रात्री 12 वाजता वळीवडे येथील नागरिकांचे स्थलांतर. कोल्हापूर शहरातील व्हीनस कॉर्नर ते कोंडा ओळ मार्गावर पुराचे पाणी आल्याने रस्ता बंद झाला. चौकातील सर्व दुकानदारांना साहित्य हलवण्यास सांगण्यात आले. सकाळी 7 वाजता पन्हाळा तालुक्यातील माळवाडी पुलावर पाणी आल्याने माळवाडी, तिरपन, दिगवडे या 3 गावांचा पूर्णपणे संपर्क तुटला. तोपर्यंत पावसाचा जोर किंचित ओसरल्याने राधानगरी धरणाचा एक दरवाजा बंद झाला. 6 दरवाज्यांतून 10 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. व्हीनस कॉर्नर चौक परिसरात 1 फूट पाणी साचले. दुपारी 2 वाजता नदीची पाणी पातळी 48.1 फुटांवर गेली व 98 बंधारे पाण्याखाली होते. तोपर्यंत अनेक गावामध्ये पाणी शिरले. न्यु पॅलेस परिसरात रेस्क्यू सुरू ऑपरेशन सुरू झाले. दुपारी अडीच वाजता नृसिंहवाडी दत्त मंदिर रोड आणि व्यापार पेठेत पाणी शिरले. 4 वाजता पुन्हा राधानगरीचे सातवा दरवाजा उघडून 11 हजार 400 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. राजाराम बंधाऱयावरील नवीन पुल सुद्धा पाण्याखाली गेला. गडहिंग्लज-संकेश्वरवरील व्हिक्टोरिया पूल वाहतुकीस बंद झाला. 1 हजार 353 कुटुंबातील 5 हजार 851 लोकांचे स्थलांतर झाले होते. पुढेच दोन दिवस शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर झाली. साडे आठ वाजता नदीची पाणी पातळी 49.2 वर गेली. चिखली आणि शिरोळमधील पूरपरिस्थितीमुळे एनडीआरएफच्या 2 पथकांना पाचारण करण्यात आले. सिद्धार्थ नगरयेथील 100 पेक्षा जास्त घरे पाण्याखाली गेली. रात्री 9:30 वाजता पुणे-बंगळुरू महामार्ग बंद झाला. निलेवाडी येथे रेस्क्यूकरून 250 लोकांना पाण्याबाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. 5 ऑगस्टला शेवटी रात्री पाऊणे बारा वाजता राधानगरी धरणाचे मेन गेट चार फुटांनी उचलण्यात आले व त्यातून सहा हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला. याशिवाय धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे खुले होते.
6 ऑगस्ट 2019 -
रात्री 12 वाजता महापुराने 2005 च्या महापुराचे रेकॉर्ड तोडले. राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 50 फुटांवर पोहोचली शिवाय 107 बंधारे पाण्याखाली गेले. पंचगंगा रुग्णालयाच्या मारूती मंदिराजवळ पुराचे पाणी पोहोचले. सकाळी 10 वाजता एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीलासुद्धा मदतीसाठी बोलवण्यात आले. शिवाजीपूलाकडे जाणारा रस्ता तोरस्कर चौकात बंद झाला. सकाळपासून आंबेवाडी आणि प्रयाग चिखलीमधून आपत्ती व्यवस्थापन पथक आणि व्हाईट आर्मीच्या माध्यमातून बाचावकार्य सुरू झाले. आंबेवाडी आणि चिखलीतील सुमारे 300 कुटुंबांना बोटीतून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले मात्र अजूनही अनेक कुटुंब मदतीच्या प्रतिक्षेत होते. सायंकाळी 5 वाजता कळंबा तलावाची पाणीपातळी 29 फुटावर गेल्याने सांडव्यावरून पाणी बाहेर पडले. राधानगरी धरणातून 17 हजार 400 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. संपूर्ण जिल्हा आर्मी, नेव्ही आणि कोस्टगार्ड पथकांच्या प्रतिक्षेत होता मात्र, खराब हवामानामुळे नेव्ही आणि कोस्टगार्डचे हेलिकॉप्टर कोल्हापूरात पोहोचले नाही. 106 जणांचे आर्मी आणि एनडीआरएफचे पथक कोल्हापूराजवळ पोहोचले मात्र महामार्गावर पाणी आल्याने दुसऱ्या बाजूला अडकून राहिले. 12 वाजता राजाराम बंधाऱयाची पाणीपातळी 54.5 फुटांवर गेली व इतर 111 बंधारे पाण्याखाली गेले.
7 ऑगस्ट 2019 -
पहाटे 5 वाजता राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 54.10 फुटांवर गेली. धोक्याच्या पातळीपेक्षा 11 फुट जास्त पाणी वाहत होते. 7 वाजता महामार्गावर तब्बल 4 ते 5 फूट पाणी आले. अॅपल सरस्वती हॉस्पीटलमध्ये पुराचे पाणी शिरले. रुग्ण, नातेवाईक, कर्मचारी अशा 200 हून अधिक नागरिकांना रेस्क्यू केले गेले. सकाळी 7:30 वाजता शिरोली येथे पोहोचलेल्या एनडीआरएफ आणि आर्मीच्या जवानांनी आपल्या बोट तयार करायला सुरुवात केली. सकाळी 9:30 वाजता गोवा कोस्ट गार्डचे 1 हेलिकॉप्टर बोटींसह मदतीला दाखल झाले. 15 मिनिटानंतर नौसेनेच्या आणखी दोन विमानातून 22 जणांचे पथक व एक बोट दाखल झाली. सकाळी 10 वाजता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकाऱयांशी चर्चा करून मदत कार्याचा आढावा घेतला. सकाळी ठीक 10:15 वाजता शिवाजी पुलावरून आर्मी आणि एनडीआरएफच्या जवनांकडून मदतकार्याला सुरुवात झाली. दिवसभरात महापुराची स्थिती बिकट बनली. सायंकाळी 4 वाजता एअरफोर्सच्या विशेष विमानाने संभाजीराजे नौदलाच्या प्रशिक्षित जवानांसोबत कोल्हापूरकडे रवाना झाले. दिवसभरात स्थानिक 14, एनडीआरएफ 7, आर्मी 4 आणि नेव्हीच्या 4 अशा एकूण 29 बोटींच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध भागात बाचावकार्य सुरू होते. रात्री 11 वाजता राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 54.8 फुटांवर गेली. दिवसाअंती जिल्ह्यातील 227 गावांमधील 22 हजार 285 कुटुंबातील 1 लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते.
(पुढचा भाग 8 ऑगस्ट रोजी)