कोल्हापूर - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या उपचारार्थ मदत व्हावी या भावनेतून शिवसेनेच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज जिल्हा प्रशासनाकडे २० व्हेंटिलेटर सुपूर्द करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी या व्हेंटिलेटरचा स्वीकार केला. शिवसेना नेहमी 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण करत आली आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना काळात शिवसेनेने आपल्या पक्षाच्या वतीने हातभार लावला असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले.
जिल्ह्यातील महत्वाच्या रुग्णालयात सद्या हे व्हेंटिलेटर करणार सुपूर्द -
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना सुद्धा व्हेंटिलेटरची सोय असावी यासाठी हे सर्वच व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. मात्र तात्पुरत्या स्वरूपात शहरातील सीपीआर, इचलकरंजी येथील आयजीएम आणि गडहिंग्लज येथील एसडीएच रुग्णालयाकडे हे व्हेंटिलेटर सुपूर्द करण्यात येणार असून गरजेनुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालयात त्याचा वापर करण्यात येणार आहे. दरम्यान, या मिळालेल्या व्हेंटिलेटरमुळे कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून रुग्ण बरे होऊन जिल्ह्याचा रिकव्हरी रेट सुद्धा वाढण्यास निश्चितपणे मदत होणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, माजी आमदार सत्यजित पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे आदी उपस्थित होते.