कोल्हापूर- जिल्ह्यातील जयसिंगपूरमधील एका शाळेतील शिक्षिका कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने तब्बल १२० विद्यार्थिनींना घरी विलगीकरणात ठेवले आहे. हा प्रकार लक्ष्मी विलास गर्ल्स हायस्कुल येथे घडला आहे. शाळा प्रशासनाने अकरावी व बारावीचे वर्ग सोमवारपासून बंद ठेवले आहेत.
राज्यातील शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षक आणि शिक्षिकांना कोरोना झाल्याचे निदर्शनास आले. याला कोल्हापूरदेखील अपवाद नाही. मात्र, जयसिंगपूर येथे एका महिला शिक्षिकेला कोरोनाची लागण झाल्यानंतर तब्बल १२० विद्यार्थिनीसह २० कर्मचाऱ्यांना घरी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. ही बाब कळताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यंत्रणा गतिमान केली आहे.
हेही वाचा-अँटिलिया प्रकरण : अंबानी कुटुंबियांना जैश-उल-हिंदने धमकी दिली नाही; टेलीग्रामवर खुलासा
शाळेतील शिक्षकांचे तातडीने स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. तर शुक्रवारी, शनिवारी वर्गात असणाऱ्या अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची माहिती घेऊन विद्यार्थी, पालकांनाही याबाबत कल्पना देऊन त्यांना विलिगीकरणात होण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंगळवारी २० शिक्षक व १२० विद्यार्थ्यांचे स्वॅब घेऊन त्यांना विलिगीकरणात जाण्याच्या सूचना पालिका आणि आरोग्य प्रशासनाने दिल्या आहेत. यामुळे शहरातील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा-धक्कादायक : कोविड रुग्णालयात कोरोना बाधित महिलेशी अश्लील चाळे, वार्डबॉयवर गुन्हा दाखल
मुख्याध्यापकाचा बेजबाबदारपणा उघडकीस
शिक्षिका पॉझिटीव्ह आढळल्यानंतरही मुख्याध्यापकांनी ही गंभीर बाब प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा नगरपालिकेला वेळेत कळविली नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडूरंग खटावकर यांनी स्वत: मुख्याध्यापकांना विचारणा करून त्यांना धारेवर धरले. शिक्षिका पॉझिटीव्ह व विद्यार्थिनी विलगीकरणात असतानाही याबाबत प्रशासनाला मुख्याध्यापकांनी कळविले नाही. त्यामुळे मुख्याध्यापकांचा बेजबाबदारपणाही उघड झाला.
शिक्षिकेचा हलगर्जीपणा
संबंधित शिक्षिका कोल्हापूरातील रहिवाशी आहे. तिच्या पतीलाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यापाठोपाठ शिक्षिका पत्नीही पॉझिटीव्ह आढळली आहे.तत्पूर्वी शुक्रवारी, शनिवारी त्यांनी अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकविले. पती पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शिक्षिकेनेही स्वॅब तपासणीसाठी दिले होते. मात्र, पतीला कोरोनाची लागण होऊनही शिक्षिका शाळेत रुजू झाली होती.