कोल्हापूर : यंदा चांगला पाऊस होणार या आशेने शेतकऱ्यांनी खरिपाच्या विविध पीकांची पेरणी केली होती. मात्र, आता मान्सूनपूर्व पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.
येत्या चार दिवसात पाऊस झाला नाही तर, पेरणी वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात रोहिणीच्या पावसावर अनेक शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या होत्या. तर सध्याही काही शेतकरी धूळवाफेवर पेरणी करत आहेत. मात्र आता पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.
10 टक्के पेरणी पूर्ण : राज्यासह जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. हवामान खात्याने 23 जुन नंतर मान्सून राज्यात सक्रिय होईल असे संकेत दिले आहेत. कोल्हापूर जिल्हयातील मुख्य पावसाळी पीक असलेल्या, भाताची पेरणी अवघी 10 टक्के पूर्ण झाली आहे. पाऊस येईल या आशेने काही शेतकऱ्यांनी शिवाराची मशागत करून भात, भुईमुगाची पेरणी केली आहे. आता बळीराजा चातकांप्रमाणे पावसाची वाट बघत असल्याचे चित्र कोल्हापूर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
शेतकऱ्यांनी गोंधळून जाण्याची गरज नाही : जिल्ह्यात भात, भुईमूग, नाचणी, सोयाबीन या खरीप पिकांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांकडे अजून पुरेसा अवधी आहे. 15 जुलै पर्यंत पेरणी होऊ शकते. मात्र पाऊस नाही म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गोंधळून जाण्याची गरज नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 23 जूननंतर राज्यासह जिल्ह्यात मान्सून सक्रिय होईल. किमान 65 ते 70 मिलिमीटर पाऊस जिल्ह्यात झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय दिवेकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात 14 भरारी पथके तैनात : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिपासाठी लागणाऱ्या बी बियाणे तसेच खतांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रे, बी बियाणे वितरक यांची भरारी पथकांच्या माध्यमातून तपासणी होत आहे. शेतकऱ्यांना बी बियाणे खतांच्या संदर्भात कोणती तक्रार असेल, तर तालुका कृषी अधिकारी यांची संपर्क साधण्याचे आवाहन कृषी अधीक्षक दिवेकर यांनी केले आहे.
हेही वाचा -