जालना - सततची नापिकी आणि कर्ज बाजारीपणाला कंटाळून बदनापूर तालुक्यातील सागरवाडी येथील एका 38 वर्षीय तरुण शेतकऱ्याने शनिवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली. कचरूसिंग दिवाणसिंग जारवाल, असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्याने शेतातच विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. तरूण शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा - देवगाव-माळेगाव रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे; कामाची चौकशी करण्याची मागणी
बदनापूर तालुक्यातील सागरवाडी येथे कचरूसिंग या शेतकऱ्याती तीन एकर शेतजमीन आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे सततची नापिकी आणि शेती पिकांच्या उत्पादनात होणाऱ्या प्रचंड घटीमुळे हा शेतकरी संकटात होता. त्याने महाराष्ट्र बँकेच्या गेवराई बाजार शाखेतून आणि महिंद्रा फायनान्सकडून जवळपास अडीच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. यंदाही खरीप हंगामात अत्यल्प उत्पादन झाल्यामुळे हे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत हा शेतकरी होता. त्यातच मुलीचे लग्नाचे वय झाल्याने लग्न कसे करावे या चिंतेत या शेतकऱ्याने आपल्याच शेतात विषारी औषध सेवन केले.
हेही वाचा - पैठणजवळ जलवाहिनी फुटल्याने जालन्याच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम
ग्रामस्थांना हा प्रकार समजताच त्यांनी कचरूसिंगला औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतू रविवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, सागरवाडी येथील विशाल जारवाल यांना ही माहिती समजताच त्यांनी पोलीस प्रशासन व तहसील प्रशासनाला शेतकऱ्याच्या आत्महत्येबददल माहिती दिली. कचरूसिंग या तरुण शेतकऱ्याच्या आत्म्हत्येची बातमी समजताच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.