जालना - भौतिकशास्त्रात संशोधन करणारे खूप कमी विद्यार्थी आहेत. विषय किचकट असल्यामुळे या विषयासाठी प्राध्यापक देखील कमी आहेत. त्यामुळे या विषयात 'मास्टर ऑफ सायन्स'(एमएस)ची पदवी मिळवून रिसर्च असिस्टंट होण्याचा व विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्राची आवड लावण्यासाठी काम करण्याचा निर्धार यश सुनिल कारमपुरी या विद्यार्थ्यांने केला आहे.
कोण आहे यश कारमपुरी -
यश कारमपुरीने जालना शहरात दहावीपर्यंत सेंट मेरी हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने जालना एज्युकेशन सोसायटीमधून बारावी पूर्ण केली. बारावीचा अभ्यास करत असतानाच त्याने 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च'(आयसर)चा अभ्यासक्रम देखील पूर्ण केला. या परिक्षेत त्याला आपल्या नावाप्रमाणेच यश मिळाले. काही दिवसांपूर्वी या महाविद्यालयात त्याचा प्रवेश निश्चित झाल्याचे पत्र त्याला मिळाले आहे. त्याचे वडील सुनील कारमपुरी मंडळ अधिकारी असून आई मीनाक्षी कारमपुरी श्री सरस्वती भुवन हायस्कूलमध्ये सहशिक्षिका आहेत. त्याची बहिण समीक्षा एमबीबीएस आहे.
आयआयएसईआरची भारतामध्ये आहेत फक्त सात महाविद्यालये -
अशा प्रकारचे उच्च शिक्षण देणारी महाविद्यालय भारतामध्ये फक्त सात ठिकाणी आहे. त्यामध्ये पुणे, कोलकत्ता, मोहाली, भोपाळ, तिरुवनंतपुरम्, तिरुपती, बहरामपुर यांचा समावेश होतो. देशभरातील सात महाविद्यालयांपैकी पुणे येथे असलेल्या महाविद्यालयात यशची निवड झाली आहे.
अशी होते निवड -
या सात महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासठी देशभरातून पन्नास ते साठ हजार विद्यार्थी परीक्षा देतात. त्यापैकी 1 हजार 660 विद्यार्थ्यांची निवड होते. यातील 280 विद्यार्थी हे पुणे येथील महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी निवडले जातात. त्यामध्ये यश कारमपुरीची निवड झाली. पुढील पाच वर्ष तो या महाविद्यालयात शिक्षण घेईल आणि त्यानंतर त्याला 'मास्टर ऑफ सायन्स' ही पदवी मिळेल. ही पदवी मिळाल्यानंतर त्याची रिसर्च असिस्टंट म्हणून देखील निवड होईल. त्यानंतर त्याला भारतातील अग्रगण्य माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये, भाभा अनु संशोधन केंद्र, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अशा संशोधन संस्थांमध्ये काम करता येईल.