जालना- घरामधील वस्तुंमध्ये वीज प्रवाहित झाल्याने आज सकाळी एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बदनापूर तालुक्यातील हिवरा राळा येथे ही घटना घडली. रामकौर गंगाधर खडेकर (वय.४५) असे मृत महिलेचे नाव आहे.
गावातील रोहित्र्यामधून जेवढ्या घरांना विद्युत पुरवठा केला गेला त्या सर्व घरांमधील वस्तुंमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विजेचा प्रवाह संचारला आहे. घरातील पंखे, स्टीलचे डबे, एवढेच नव्हे तर भिंतीला ठोकलेल्या खिळ्यांमध्ये देखील वीज प्रवाहित झाल्याची चर्चा परिसरात होती. यासंदर्भात गावकऱ्यांनी वारंवार वीज वितरण कंपनीच्या अभियंत्याकडे, लाईनमनकडे तक्रारी केल्या. मात्र, कोणीही त्याची दखल घेतली नाही. शेवटी आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास रामकोर गंगाधर खडेकर या पंखा बंद करण्यासाठी गेल्या असता त्या बराच वेळ पंख्याला चिटकून बसल्या आणि नंतर लांब फेकला गेल्या. अशाच प्रकारच्या अनेक घटना यापूर्वी देखील घडलेल्या आहेत. फक्त माणसांनाच नव्हे तर जनावरांना देखील याचा फटका बसलेला आहे. आज सकाळी ही घटना घडल्यानंतर रामकौर खडेकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले आहे.
हेही वाचा- कस्तुरबाडीत लाखोंचा अवैध गुटखा जप्त, बदनापूर पोलिसांची कारवाई