जालना - पोलीस म्हटलं की अनेकांना धसका बसतो. पण कौटुंबिक कलह सोडवून २५ जोडप्यांचा संसार परत फुलविण्यात जालना पोलिसांनी महत्त्वाची भूमिका वठवली आहे. महिला समुपदेशन केंद्राच्या मध्यस्थीने 25 जोडप्यांचे वाद सामोपचाराने मिटवून त्यांचा संसाराचा गाडा पुन्हा सुरू करण्यास मदत मिळाली आहे. महिला समुपदेशन केंद्राच्या वतीने 1 जानेवारी 2018 ते 10 मे 2019 दरम्यान आलेल्या प्रकरणात कलम 498 चा एकही गुन्हा दाखल न करता सामोपचाराने कौटुंबिक वाद सोडविण्यात आले आहेत.
सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिला समुपदेशन केंद्र आहे. 1 जानेवारी 2018 ते 10 मे 2019 दरम्यान इथे 65 प्रकरणे नोंदविली गेली. त्यापैकी 25 विवाहितांनी वारंवार या केंद्राला भेट दिली. त्यामुळे या 25 जणींचे मन वळविण्यासाठी समुपदेशन केंद्राने मध्यस्थाची भूमिका घेत त्यांना समजावून सांगून पतीकडे परत जाण्याची वाट मोकळी करून दिली. मात्र, उर्वरित प्रकरणांमध्ये संबंधित तक्रारदार तक्रार दिल्यानंतर परत या केंद्रात आलेच नाहीत, त्यामुळे त्यांचे पुढे काय झाले हे सांगता येणे देखील कठीण आहे?
महिलांवर अत्याचार झाला, त्यांचा शारीरिक व मानसिक छळ झाला, यासारखे गुन्हे पोलीस ठाण्यात नोंदविण्यासाठी या समुपदेशन केंद्राचे पत्र लागते. ते पत्र दिल्याशिवाय कलम 498 चा गुन्हा दाखल केला जात नाही. पर्यायाने मागील वर्षभरात या समुपदेशन केंद्राच्या वतीने अशा प्रकारचे एकही पत्र देण्याची गरज पडली नाही. ही एक जमेचीच बाजू म्हणावी लागेल. समुपदेशनासाठी महिलांच्या वतीने श्रीमती व्ही. एस. माघाडे, तर पुरुषांच्या वतीने एस. एस. कराळे हे इथले काम पाहतात.