जालना- तीन पायाचे हे राज्य सरकार स्वतःचेच पाय एकमेकात अडकून पडत असेल, तर त्याचा दोष भाजपला देऊ नये. सरकार पाडण्याचा खटाटोप आम्ही करत नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ईटीव्ही भारतीशी बोलताना दिली.
खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज चर्चा झाली. या चर्चेमुळे राज्य सरकार पडणार असल्याच्या अफवांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री खासदार रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, 'गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी दिल्लीत खासदार राऊत आणि माझी सकाळी फिरत असताना भेट झाली होती. आम्ही शेजारीच राहतो. आणि आमच्या भेटी होत असतात. त्याचा फारसा काही राजकीय अर्थ काढायचा नसतो. भारतीय जनता पार्टी सरकार पाडण्यासंदर्भात चर्चा करत नाही. परंतु, हे तीन पायाचे सरकार जर स्वतःच्या पायात पाय अडकून पडत असेल, तर त्याचा दोष भारतीय जनता पक्षाला देऊ नये, असे दानवे म्हणाले.
तसेच, आमच्या सरकारने सुरू केलेल्या योजना या सरकारने बंद केल्या आहेत. खरतर या योजनांना अधिक निधी देऊन त्या सुरू करणे गरजेचे आहे, अशी आमची मागणी आहे. मात्र, तसे होत नाही. आणि तसे होत नसले तरीही हे सरकार पाडण्याचा खटाटोप आम्ही करणार नाही. आमच्यात राजकीय मतभेद असतील, मात्र आम्ही वैरी नसल्याचे खासदार रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा- विनायक देशमुख यांनी स्वीकारली नूतन पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे