जालना - गेल्या वर्षभरापासून जालना शहरातील एकमेव चौपाटी असलेली मोतीबाग बंद आहे. त्यामुळे या परिसरात खान-पान व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे धंदे बंद आहेत. अशा परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे अवघड झाले असताना नगरपालिकेचे भाडे भरायचे कसे? असा प्रश्न या व्यावसायिकांसमोर असल्याने शासनाने उदरनिर्वाह भत्ता द्यावा, नाही तर किमान पालिकेने एक वर्षाचे भाडे माफ करावे अशी मागणी व्यावसायिकांनी जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
व्यापार्यांचे, उद्योजकांचे शहर म्हणून जालना शहराची ओळख आहे. या शहरात विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून एकमेव मोतीबाग आहे. ही बाग गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या महामारीमुळे बंद आहे. त्यामुळे या परिसरात आईस्क्रीम, भेळपुरी, पाणीपुरी, रगडा अशा खाण्यापिण्याच्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. जालना नगरपालिका या व्यावसायिकांना दरमहा 2 हजार रुपये भाडे आकारते. मात्र ग वर्षभरापासून धंदाच नाही, त्यामुळे कुटुंब चालवणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये शासनाने मदतीचा हात म्हणून व्यवसाय करणार्या व्यावसायिकांना आर्थिक मदत द्यावी आणि किमान ती होत नसेल तर भाडे माफ करावे अशी त्यांची मागणी आहे. मागील वर्षभरात मध्यंतरी चार-पाच महिने बाग सुरू नसली तरी बाहेरच्या परिसरामध्ये कसाबसा थोडाफार का होईना हा व्यवसाय सुरू होता. आता तो पूर्णतःच बंद झाला आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत व्यावसायिकांना परवानगी असल्यामुळे या वेळेत तिकडे एक माणूस देखील फिरकत नाही. त्यामुळे व्यवसाय करण्याचा तर विषयच नाही. म्हणून या व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कोरोना काळातील नगरपालिका आकारत असलेले भाडे रद्द करावे, अशी मागणी केली आहे. संभाजी भोसले, लक्ष्मण मस्के, राम मस्के, गोपाळ चुडावन्त, अविनाश चटाले, रमेश मनसुरे, आदी व्यावसायिकांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे.