जालना - राहुल गांधींना धक्काबुक्की झालीच नाही, कदाचित त्यांचा तोल गेला असावा, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे. भोकरदन येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सुरू असलेल्या धरणे आंदोलन स्थळी दानवे यांनी भेट दिली. त्यावेळी हाथरसला भेट द्यायला जाणाऱ्या राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्की संदर्भात विचारणा केली असता, दानवे यांनी ही प्रतिक्रिया दिली.
हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केली होती, असं समोर आले होते. या धक्काबुक्कीनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले. तर या धक्काबुक्की प्रकरणानंतर अनेकांनी यूपी सरकारवर निशाणा साधला आहे. या संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना विचारणा केली असता, दानवे म्हणाले, की एवढ्या मोठ्या नेत्याला कोणीही धक्काबुक्की करु शकत नाही. अशा गर्दीत आम्हीदेखील अनेक वेळा जातो. पब्लिकचा रेटा असतो. तिथे नेत्यांच्या पुढे-पुढे करणाऱ्यांची गर्दी असते, त्यामुळे कदाचित राहूल गांधी जमिनीवर पडले असतील.
हाथरस बलात्कार प्रकरणी देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत असताना, यूपी पोलिसांच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला जात आहे. त्याच प्रमाणे काँग्रेस नेते राहूल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेनंतर महाराष्ट्रातही याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.