बदनापूर (जालना) - उन्हाचा तडाखा वाढत असतानाच आज दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. या गारपीटीमुळे टोमॅटो, मिरची, कांद्यासह आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी जोरदार पावसामुळे शहरी भागासोबत ग्रामीण भागाचा वीजपुरवठादेखील खंडित झाला होता.
अवकाळी पावसामुळे पावसाचे नुकसान -
उन्हाचा प्रचंड तडाखा व वातवरणात अतिशय उष्णता निर्माण झाली होती. रविवार दुपारपर्यंत उन्हाचे चटके बसत असतानाच दुपारनंतर ढग जमा झाले. तसेच दुपारी चारनंतर जोरदार वारे वाहू लागून अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे काढणीच्या तयारीत असलेला गहू, हरभरा झाकण्यासाठी धावपळ झाल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे टोमॅटो, मिरची, कांदा, कोथिंबीरसह पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच झाडांवर बहरलेल्या आंब्यांना वादळी वाऱ्यामुळे तडाखा बसला असून प्रचंड प्रमाणात आंब्याची गळ झाली आहे. त्याचप्रमाणे कांद्याची बियाणे उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांचे बियाचे डोंगळे (फुलांचा गुच्छ) ही विखरून खराब झाल्याचे चित्र आहे.
बाजार गेवराई, ढासला शिवारात गारपीट -
तालुक्यातील बाजार गेवराई, ढासला, दुधनवाडी, गोकूळवाडी, सोमठाणा, वाल्हा, सागरवाडी येथे प्रचंड वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली. या गारपीटीमुळे या डाळींब, मोसंबी, द्राक्षे या फळपिकांना प्रचंड फटका बसला तसेच जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.
हेही वाचा - 'झाशीच्या राणीप्रमाणे ममतादीदी लढल्या आणि जिंकल्या'