जालना - वीज बिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या तोंडाला दोघांनी काळे फासल्याची घटना परतूर येथे घडली. या प्रकरणी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याने परतूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी दोघांजणा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दत्तात्रय आसाराम भोंगाने 32, आणि त्यांचे सहकारी आबेद अबूकर अशी त्या दोन वीज कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
वीज बिल वसुलीचे वाद-
मार्च महिना जवळ येत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीही सक्तीने थकबाकी वसुलीला सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर परतुर येथील वीज वितरण कंपनीत वरीष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम करत असलेले दत्तात्रय आसाराम भोंगाने (32), आणि त्यांचे सहकारी आबेद अबूकर हे दोघे परतूर तालुक्यातील रोहिना येथे वीज बिल वसुलीसाठी रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास जात होते. त्यावेळी परतुर-वाटुर मार्गावर रोहिना येथीलच आसाराम शेळके यांच्या हॉटेलवर गावातील विष्णू ढोणे, रामप्रसाद टोम्पे, किसन काकडे आणि इतर अन्य काही लोकांसोबत वीज बिल वसुली सोबत चर्चा केली.
या चर्चेदरम्यान तिथे उपस्थित असलेल्या भगवान आनंदराव पाटोळे आणि त्यांचा भाऊ नारायण पाटोळे यांनी दत्तात्रय वीज कर्मचारी आसाराम भोंगाने यांना शिवीगाळ करत सोबत आणलेले डब्यातील काळे ऑइल या कर्मचाऱ्यांच्या तोंडाला फासले. तसेच त्यांना मारहाण करून करून जीवे मारण्याची धमकीही दिली. दरम्यान, सोबत असलेल्या काही सहकाऱ्यांनीही मारहाण सोडवण्याचा प्रयत्न केला.
परतुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल-
वरीष्ठ तंत्रज्ञ दत्ताराम भोंगाने यांनी घडलेला सर्व प्रकार त्यांचे वरीष्ठ उपकार्यकारी अभियंता निलेश बेडाळे यांना सांगितला. त्यानंतर परतूर पोलीस ठाण्यात नारायण पाटोळे राहणार, रोहिना. आणि भगवान पाटोळे या दोघांविरुद्ध तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा, जीवे मारण्याची धमकी देणे, आदि कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.