जालना - जालना ते देऊळगाव राजा रस्त्यावर जामवाडी हद्दीमध्ये 72 तासांत झालेल्या दुसऱ्या अपघातात आणखी दोन जणांना जीव गमवावा लागला आहे. यापूर्वी 12 तारखेला संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास याच विहिरीत एक चारचाकी वाहन पडून दोघा जणांचा मृत्यू झाला होता.
![72 तासांत त्याच ठिकाणी पुन्हा अपघात](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-jal-02-jambvadi-avb-10042_14022021103141_1402f_1613278901_984.jpg)
याच विहिरीत आज पुन्हा एक चारचाकी वाहन पडले आहे. सुदैवाने वाहनातील दोन पुरुष पोहून वरती आले. मात्र, एक चार वर्षांची मुलगी आणि एक तीस वर्षांची विवाहित महिला गाडीत अडकल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, ज्या महिलेचा गाडीमध्ये मृत्यू झाला, त्या महिलेला हे वाहन विहिरीत जात असल्याचे जाणवल्यामुळे तिने वाहनातील एका लहान मुलीला वाहनाचे दार उघडून बाहेर फेकल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे एकूण पाच जणांपैकी तीन जणांचा जीव वाचला असून दोघा जणांचा मात्र बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सर्वजण सिंहडोह (ता. मानोरा, जि. वाशिम) येथील रहिवासी आहेत.
जालना ते देऊळगाव राजा रोडवर दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी चारचाकी विहिरीत पडून अपघात झाला होता. आजही (ता. 14) सकाळी पुन्हा आणखी एक पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी याच विहिरीत पडली. जय गुणवंत वानखेडे, गोपाल विठ्ठल खानदे, वेदिका गोपाल खानदे, आरती गोपाल खानदे, माही गोपाल खानदे असे पाच प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी जय गुणवंत वानखेडे, गोपाल खानदे, वेदिका खानदे यांना विहिरीतून वरती काढण्यात यश आले आहे. आरती व माही या दोघींचा वाहनात अडकल्यामुळे विहिरीत बुडून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह वरती काढून पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी पाठविले आहेत.
72 तासांच्या आत त्याच ठिकाणच्या या विहिरीत चारचाकी पडल्याची ही दुसरी घटना असल्यामुळे जामवाडी परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. या रस्त्याच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आला आहे. महामार्ग असल्यामुळे या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.