जालना - पारशेंद्रा (ता.जालना) गावात तरुणांच्या जमावाकडून करण्यात आलेल्या मारहाणीत सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. जुन्या भांडणातून आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. राहुल गौतम बोर्डे (वय 25), प्रदिप गौतम बोर्डे (वय 23), अशी दोघा भावांची नावे आहेत. यापैकी राहुलचा जागीच मृत्यू झाला तर प्रदीप हा गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
याविषयी अधिक माहिती अशी की, गावातील काही तरुणांसोबत पोळ्याच्या दिवशी राहुल बोर्डे याचा वाद झाला, त्यातून किरकोळ हाणामारी झाली होती. हे प्रकरण जालना तालुका पोलीस ठाण्यापर्यंत गेले होते. मात्र, काही दिवसात हे प्रकरण शांत झाल्यामुळे पोलिसांनी त्याकडे लक्ष घातले नाही. परंतु, आज सकाळी जुन्या भांडणाच्या कारणावरून गावातील जवळपास १५ तरुणांनी या दोघा भावांना गाठले आणि त्यांचा पाठलाग करून दुसर्या गल्लीत नेऊन दगडाने आणि तीक्ष्ण हत्याराने त्यांच्यावर हल्ला केला. यात राहुलचा जागीच तर प्रदिपचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यासंदर्भात पोलीस अधीक्षक चैतन्य आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सध्या गावामध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश तलवार, मारुती वाटुरे, आर. यस. डोईफोडे, अशोक जाधव आदी कर्मचारी घटनास्थळी पहारा देत आहेत. यासंदर्भात तालुका पोलिसांनी सोळा आरोपींना ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा - 'कंगना येथे आल्यावर तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही', शिवसेना आमदाराची धमकी