जालना - जुना जालना परिसरात कुंडलिका नदीच्या काठालगत असलेल्या किल्ला जिनिंग भागात एका २२ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. ही घटना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. कुमार शरदचंन्द्र झुंजूर (२२) असे या खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो मस्तगड परिसरातील रहिवासी आहे.
शहरातील देहेडकर वाडीसमोर आणि कुंडलिका नदीच्या काठावर बंद पडलेली किल्ला जिनिंग नावाची एक जुणी जिनिंग मिल आहे. या जिनिंगला लागुनच मल्लाव समाजाचे काळुंका देवीचे पुरातन मंदिर आहे या मंदिरामध्ये असलेल्या परिसरात कुमार झुंजुर या तरुणाचा रात्री खून करण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री साडेदहा वाजेपर्यंत हा तरुण मस्तगड परिसरात होता. त्यानंतर मात्र तो गायब झाला.
गुरुवारी सकाळी त्याचा खून झाल्याचे समोर आले. तरुणाच्या डोक्यावर जबर मारहाण करण्यात आली असून छातीवर आणि पोटावर चाकूचे वार करण्यात आलेले आहेत. त्याच्या पोटात चाकू तसाच खुपसलेला आहे. कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, तज्ञ विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेजुळ, मोबाईल फॉरेन्सिक सपोर्ट युनिटचे सहाय्यक आर. एस. खलसे प्रकरणाचा तपास करत आहेत.