जालना- शहरात एकाच दिवसात 29 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण वाढण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे जालना शहरातील नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. 29 रुग्णांमध्ये सामान्य रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे.
29 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्यामुळे एकूण रुग्णसंख्या 353 वर जाऊन पोहोचली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यानंतर आता जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सामान्य रुग्णालयातून चालवली जाते, त्याच सामान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे.
शहरातील गजबजलेल्या आणि दाट वस्ती असलेल्या भागांमध्ये देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे जालना शहरातील नागरिकांचे धाबे दणाणले आहेत. शहरांमधील खडकपुरा, आनंद नगर, लक्कडकोट, समर्थ नगर, कन्हैया नगर, राजेंद्र प्रसाद रोड, मंगळ बाजार, आदी ठिकाणी काल रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. तसेच या परिसराला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्यानंतर येथील नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे पोलिसांचा देखील ताण वाढला आहे.
दरम्यान, शुक्रवारपासून शहरांमध्ये व्यापारी महासंघाने स्वयंस्फूर्तीने तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लागू केल्यामुळे रुग्ण वाढीला आळा बसेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.