बदनापूर (जालना) - प्रशासन तसेच विविध सामाजिक संघटनेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. मात्र बदनापूर शहरात शुक्रवारी दिपावलीच्या पूर्वसंध्येला शहरातील मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले. आज बदनापूरचा बाजार असल्याने आणि उद्या दिवाळी असल्याने गर्दीचे प्रमाण जास्त आहे. मात्र, या गर्दीमुळे औरंगाबादकडून जालनाकडे जाणाऱ्या महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे या महामार्गावर वाहनांच्या दीड ते दोन कीलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्या होत्या.
कोरोनाचे सावट असले तरी उत्साह-
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळातील सर्व सण नागरिकांनी शांततेत व गर्दी होऊ न देता साजरे केले. मात्र, लॉक उठवल्यानंतर दिवाळी हा पहिलाच सण फारसे निर्बंध न पाळता साजरा करण्याची मुभा मिळाली आहे. परिणामी दिवाळीसण साजरा कण्यासाठी गावोगावच्या नागरिकांनी आज बदनापूरच्या बाजारात खरेदीसाठी गर्दी केली आहे. आरोग्य विभागाने डिसेंबरअखेर दुसरी लाट येणार असे संकेत दिलेले असल्यामुळे कोरोनाचे सावट असले तरी नागरिकांमध्ये दिवाळी सणाचा उत्साह अधिक असल्याचे दिसून येत आहे.
कपडे, वाहन व पूजेचे साहित्य विक्री दुकानात गर्दी-
गाव-खेडयातील ग्रामस्थ दिवाळीला कपडे खरेदी करतात. त्यामुळे कापड दुकानात खरेददारी जास्त दिसून येत असतानाच दुचाकी विक्री करणाऱ्या दुकानातही वाहन खरेदी होताना दिसून येतळ आहे. तसेच दिवाळीनिमित्त लागणारे साहित्य, दिवे, आकाश कंदिल, लायटिंग व पूजा साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांवरही प्रचंड गर्दी पहायला मिळाली.
फटाक्याच्या दुकानांवर बंदी-
बदनापूर नगर पंचायतने या वर्षी दिवाळीनिमित्त फटाका बाजार लावण्यास मनाई केलेली आहे. या बाबत नगर पंचायतचे अभियंता गणेश ठुबे यांनी सांगितले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बदनापूर नगर पंचायतने स्त्युत्य निर्णय घेऊन फटाका दुकानांना परवानगी दिलेली नाही, तसेच ज्यांना फटाका दुकानांची परवानगी होती. त्यांचीही परवानगी या दरम्यान रद्द करण्यात आलेली असून फटाकेमुक्त दिवाळी साजरे करण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.