जालना - शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रविवारपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल होणे अपेक्षित असताना शहर वाहतूक शाखा मात्र बिनधास्त आहे. या प्रश्नावर पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी देखील 'मैं बोलता, मैं देखता, मैं करता' असे म्हणत या प्रश्नावर बोलणे टाळले.
शहरातील दुर्गा देवी आणि मंमादेवी ही दोन शहरवासीयांची आराध्य दैवत आहेत. दर्शनासाठी भाविक पहाटे पाच वाजल्यापासूनच घराच्या बाहेर पडतात. एकंदरीत पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत शहरात वर्दळ सुरू असते. रस्त्याच्या मधोमध बसणाऱ्या जनावरांमुळे आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या हात गाड्यांना संरक्षण देणाऱ्या शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या फळगाड्यांमुळे दुचाकीधारकांनी आपली वाहने लावायची कुठे? हा मोठा प्रश्न आहे.
हेही वाचा - औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात मित्र पक्षाचा सेनेला धोका
शहर वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासनाचा 50 कर्मचाऱ्यांचा स्वतंत्र विभाग आहे. या विभागाचे वाहतूक सुरळीत करण्यापेक्षा वसुली करण्यातच जास्त लक्ष आहे. शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयाच्या आवारातच जुन्या सिग्नलचा ढीग लागलेला आहे.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोणत्याही हात गाडीवाल्याला, फेरीवाल्याला हात लावण्याची हिंमत शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांमध्ये नाही. मोकाट जनावरांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना देखील अधिकार आहेत. मात्र, त्याचा उपयोग पोलीस का करत नाहीत, असा प्रश्न नागरिक करत आहेत.