जालना - सध्या सर्वत्र सुरु असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यात कोरोना विषाणू हॉस्पिटल सुरू करण्यात येत आहे. या हॉस्पिटलसाठी लागणाऱ्या सर्व पदांसाठी म्हणजे एकूण 287 पदांसाठी उद्या (मंगळवार) 31 मार्चला थेट मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथे कोरोना विषाणू हॉस्पिटलसाठी डॉक्टर, स्टाफ नर्सेस, विशेष तज्ञ आदी पदांसाठी कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या दिवसभर थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. या मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता तसेच मूळ कागदपत्रांसह आणि या कागदपत्रांच्या साक्षांकीत प्रतिसह सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहावे असेही आवाहन करण्यात आले आहे.
रिक्त पदामध्ये एमबीबीएस, एमडी, नर्सेस, सेवानिवृत्त आरोग्य सेवक, दहावी विज्ञान विषय घेऊन उत्तीर्ण तसेच एक वर्षाचा आरोग्यसेवा पूर्ण केलेले सेवानिवृत्त आरोग्य सेवक, औषधी निर्माता, पदवीधारक अशा विविध प्रकारच्या 287 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठीची अधिक माहिती www.jalna.nic. in या वेबसाइटवर उपलब्ध असल्याचेही सांगण्यात आले आहे. उद्या 31 मार्चला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर हे अधिकारी मुलाखती घेणार आहेत.