जालना- जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेष म्हणजे जालना शहरात वाढणारी रुग्ण संख्या शहरतील नागरिकांसाठी चिंतेची बाब आहे. शुक्रवारी 18 रुग्ण आढळले होते, तर आज 37 रुग्ण आढळून आले आहेत. कालचे 18 आणि आज आढळलेल्या 37 पैकी 23 रुग्ण हे जालना शहरातील आहे. जिल्ह्याची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 462 वर जाऊन पोहोचली आहे. दरम्यान आतापर्यंत 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यामध्ये जसे -जसे सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत तशी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, या परिस्थितीला आळा घालण्यासाठी नागरिक स्वतःहून समोर येत नसल्याचे दिसत आहे. शुक्रवारी जालना शहरात 18 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते.
आज 37 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये जालना शहरातील 23 रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. उर्वरित रुग्णांमध्ये जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील 12, भोकरदन शहर एक ,परतूर तालुक्यातील वाटुर फाटा येथील एक अशा 37 रुग्णांचा समावेश आहे. आत्तापर्यंत जालना जिल्ह्यात कोरोनासह अन्य आजार असलेल्या 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.