जालना - तालुक्यातील हिस्वन (खु) गावात मोटर रिवाइंडिंगचे दुकानात चोरीचा प्रयत्न झाला. मात्र, दुकान मालकासह गावकऱ्यांच्या प्रयत्नामुळे चोरट्यांचा हा डाव फसला.
काय आहे प्रकार?
जालना तालुक्यातील हिस्वन खुर्द येथे गंगाधर बाबासाहेब आटोळे यांचे सोहम मोटर रिवाइंडिंग या नावाचे दुकान आहे. या दुकानात गावातील शेतकऱ्यांसह परिसरातील शेतकऱ्यांचे जळालेले विद्युत पंप दुरुस्तीसाठी आणून टाकलेले असतात. दरम्यान, आज पहाटे दोन वाजेच्या सुमारास गंगाधर आटोळे यांचे मामा लक्ष्मण मरगळ यांनी आटोळे यांना फोन करून सांगितले की, दुकानासमोर एक पिवळ्या रंगाची गाडी उभी आहे. या गाडीमध्ये दुकानातील विज पंप भरले जात आहेत. यानंतर आटोळे हे गावातील लक्ष्मण मरगळ, रामेश्वर गव्हाणे, अर्जुन मरगळ, श्रीराम आटोळे, असे पाच सहा जण दुकानाकडे धावले. त्याचवेळी या गाडीमध्ये वीजपंप भरून चोरटे मार्गस्थ होऊ लागले. मात्र, सर्वांनी या गाडीचा पाठलाग केला.
जमुना नगरमध्ये सापडली गाडी -
टाटा कंपनीची चार चाकी मालवाहू गाडी (क्र. एम. एच. 20 ईएल 2959) या गाडीचा पाठलाग करत असताना ही गाडी जालना शहरातील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या जमुनानगर येथील ठाकरे यांच्यासमोर लावून चोरटे पसार झाले. हा सर्व प्रकार येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामध्ये तीन चोरटे पळतानादेखील दिसत आहेत. ही माहिती तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून हे चार चाकी वाहन आणि चोरून आणलेला माल जप्त केला आहे.
हेही वाचा - धक्कादायक..! वडील आणि आजोबांची हत्या करून तरुणाची आत्महत्या
चोरी गेलेला मालामध्ये शेतकऱ्यांच्या विविध कंपनीच्या आणि वेगवेगळ्या क्षमतेच्या वीज पंपांचा समावेश आहे. सुमारे 60 हजार रुपये किमतीचे हे वीज पंप आहेत. दोन लाख रुपयाची मालवाहू गाडी असा एकूण दोन लाख 59 हजार रुपयांचा माल तालुका पोलिसांनी जप्त केला आहे.
हेही वाचा - महत्वाची बातमी : आज रात्रीपासून रेल्वेचे तिकीट आरक्षण प्रणाली राहणार बंद