जालना - बदनापूर तालुक्यातील डोंगरगाव शिवारात वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकत 85 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. डोंगरगावातील दुधना नदीच्या पात्रातून वाळूची ही चोरटी वाहतूक होत होती.
हेही वाचा... मानसी नाईक यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्याला अटक,चार दिवसांची पोलीस कोठडी
डोंगरगाव शिवारात वाळूची अवैधरित्या वाहतुक होत असल्याची माहिती विशेष कृती दलाला मिळाली. या माहितीवरून पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांनी पोलिसांना याबाबत खात्री करण्यासाठी दुधना नदी पात्राच्या ठिकाणी पाठवले. यावेळी एका मोठ्या वाहनात (हायवा - वाहन क्रमांक एम.एच. 21 डी.एच. 2389) काही लोक वाळू भरत असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्यांच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना विचारला असता, परवाना नसल्याचे आढळून आले. पोलीस त्या ठिकाणी वाहन चालक कडुबा खंडाळे (रा. घाणेवाडी) आणि वाहन मालक, समाधान दगडूबा पाळदे (रा. टाकळी, तालुका भोकरदन) यांच्यावर कारवाई करत असताना नदी पात्रात शेजारीच आणखी एका ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून वाळू भरत असल्याचे दिसले. त्यावेळी त्यांनाही परवान्याबाबत विचारणा केली, असता त्यांच्याकडेही कोणता परवाना नसल्याचे आढळून आले. यानंतर पोलिसांनी वाळूच्या या चोरट्या वाहतुकीबाबत कारवाई करत सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी 2 हायवा, एक जेसीबी, असा एकूण 85 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हेही वाचा... VIDEO : भररस्त्यात महिलेला मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद