जालना - दोन गटांमध्ये बाचाबाची होऊन गोळीबार झाल्याची घटना नूतन वसाहत परिसरातील सत्कार कॉम्प्लेक्स येथील भिमराज प्रवेशद्वारासमोर घडली होती. या गोळीबार प्रकरणातील महत्वाचा आरोपी गजानन तौर गेल्या आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत फिरत होता. तौर यास न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यामुळे आज तो स्वतःहून कदिम जालना पोलीस ठाण्यात हजर झाला. दरम्यान, पोलिसांनी तौर याला अटक केली आहे आणि उद्या त्यास न्यायालयात हजर केले जाणार आहे.
हेही वाचा - जालन्यात लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध कडक
23 जुलै 2020 रोजी जमावबंदीचे उल्लंघन करून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली होती. ही घटना सत्कार कॉम्प्लेक्स येथील भिमराज प्रवेशद्वारासमोर घडली होती. हाणामारीचे परिवर्तन नंतर गोळीबारात झाले होते. त्यानंतर एकूण 60 आरोपींविरोधात वेगवेगळ्या कलमांखाली कदीम जालना पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता. यात शहरातील अनेक नामवंत युवकांचा समावेश होता. गजानन तौर हा गुन्हेगारी क्षेत्रात सर्व परिचित होता. त्याच्यावर एकूण अठरा गुन्हे दाखल असल्यामुळे तो पोलिसांना हवा होता. जिल्हा व सत्र न्यायालय, उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ या ठिकाणी त्याने अटकपूर्व जामीन मिळावा व प्रथम खबरी अहवाल रद्द करावा याकरिता प्रयत्न केले. मात्र, तीन दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. कोणत्याही प्रकारचा दिलासा न्यायालयाने देण्यास नकार दिल्यानंतर आज स्वतःहून तो पोलीस ठाण्यात हजर झाला.
एकूण अठरा गुन्हे दाखल
गजानन तौरवर कदिम जालना पोलीस ठाण्यात 2013, 2019 आणि 2020 मध्ये 3 गुन्हे आहेत. चंदंनजिरा पोलीस स्टेशन अंतर्गत 2019 आणि 2020 मध्ये दोन गुन्हे दाखल आहेत. अंबड पोलीस स्टेशनमध्ये 2020 मध्ये एक गुन्हा दाखल आहे. याच प्रमाणे जालना शहरातील सदर बाजार आणि अन्य ठिकाणी, असे एकूण 18 गुन्हे दाखल आहेत.
या प्रकरणात सुमारे 30 आरोपींवर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी आरोपी क्रमांक 9 निलेश गोरडे याने घटनास्थळी येण्यासाठी व तेथून गोळीबार करून पळून जाण्यासाठी वापरलेली नेक्सन कार क्र. एम.एच 21. 8758 आरोपीकडून गुन्ह्याच्या तपासात फुलंब्री येथून जप्त करण्यात आली आहे. तसेच, आरोपी क्रमांक 20 सुनील रत्नपारखे याने गुन्ह्यात वापरलेली तलवार आणि घटनास्थळी येण्यासाठी व पळून जाण्यासाठी वापरलेली पल्सर दुचाकी क्र. एम एच 21 डीजे 4659 ही देखील पोलिसांनी जप्त केली आहे.
पोलिसांना देत होतात गुंगारा
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तौर याच्या मागावर जाण्यासाठी विविध पथके स्थापन केली होती. त्याचे मूळ गाव घनसांगी तालुक्यातील शिवणगाव येथे देखील पोलिसांनी रात्री-बेरात्री जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो हाती लागला नाही. कुंभार पिंपळगाव, शिर्डी, नगर, वैजापूर, औरंगाबाद अशा विविध ठिकाणी त्याला सापळे लावून अटक करण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात नगर मार्गावर देखील त्याची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला असता नगर पोलिसांना देखील गुंगारा देऊन तो पळून गेला होता. याप्रकरणी देखील गुन्हा दाखल झालेला आहे.
हेही वाचा - जालन्यात कुर्हाडीचे घाव घालून बेकरी कामगाराचा खून