जालना - विहीर दुरुस्त करताना जेसीबीच विहिरीत पडल्याची ही घटना घनसांवगी तालुक्यातील विरेगाव तांडा येथे शनिवारी (दि. 30 मे) घडली आहे. सुदैवाने यात जीवित हानी झाली नसून शेतकरी व जेसीबी मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
विहिरीच्या कठड्या भोवती भराव टाकून मजबुतीकरण करण्याचे काम जेसीबीच्या साहाय्याने चालू होते. यावेळी अचानक जेसीबी विहिरीत पडला. यावेळी चालकाने उडी मारून आपला जीव वाचविला. जेसीबी विहिरीच्या पाण्यात बुडाला असून तो बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मागील दोन दिवसांपासून या विहिरीतील पाणी उपसण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. मात्र, बाजूलाच पाटाचे पाणी भरून वाहत आहे त्यामुळे या विहिरीत मोठ्या प्रमाणात पाझर असल्याने पाणी उपसले जात नाही. सुमारे तीस फूट पाणी असलेल्या विहिरीमध्ये हे जेसीबी पडल्यामुळे तो काढायचा कसा, हा मोठा प्रश्न जेसीबी मालक आणि नागरिकांत उपस्थित झाला आहे.
विहिरीतील गाळ काढून पोकलेनच्या माध्यमातून जेसीबी बाहेर काढता येईल, असा एक सल्ला मिळाल्यामुळे जेसीबीचे मालक संभाजी राऊत त्यांनी एक चर खोदून पोकलेनच्या माध्यमातून गाळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र. पोकलेनला देखील मर्यादा असल्यामुळे हे काम अर्धवटच राहिले. त्यानंतर सेफ्टी टँक स्वच्छता यंत्राच्या माध्यमातून विहिरीतून गाळ काढण्यासाठी हे टँकर मागविले. मात्र, या टॅंकरच्या माध्यमातून गाळ उपसणे शक्य झालेच नाही. पाणी उपसण्यासाठी अनेक विद्युत पंप लावले तेदेखील वारंवार खराब होत गेले. त्यामुळे आजही हा जेसीबी या विहिरीत पडून आहे.
या शेतीकरी लहू लिंबा राठोड आणि जेसीबीचे मालक संभाजी राऊत यांचे मात्र झालेल्या नुकसानीमुळे धाबे दणाणले आहे. नुकसान भरून काढायचे कसे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. नऊ महिन्यापूर्वीच नवीन जेसीबी खरेदी केल्यामुळे विमा कंपनीने विम्याची रक्कम द्यावी, अशी मागणी संभाजी राऊत यांनी केली तर झालेले नुकसान हे आपत्तीमध्ये ग्राह्य धरून शासनाने विहीर दुरुस्तीसाठी मदत करावी, अशी शेतकरी लहू राठोड यांनी मागणी केली आहे.
हेही वाचा -टाळेबंदीमुळे तृतीयपंथीयांवर उपासमारीची वेळ