जालना- अटक न करण्यासाठी लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलीस उप निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. पोलीस उप निरीक्षक मुशीर खान कबीर खान पठाण यांनी तक्रारदाराकडे दहा हजारांची मागणी केली होती. मात्र, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्या अनुषंगाने या विभागाने चौकशी करून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सापळा लावला. यावेळी तडजोडी अंती तक्रार दाराकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुशीर खान पठाण यांच्यावर झडप घालून रंगेहाथ पकडले.
या प्रकरणातील तक्रारदाराचे मंठा तालुक्यातील अंभोरा जहागिर येथील एका मुलीसोबत दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, लग्नापासूनच पती-पत्नीचे जमत नव्हते. यातूनच मागील वीस दिवसांपासून पत्नी भावासोबत जाऊन माहेरी राहू लागली. माहेरी राहत असताना तिने मंठा पोलीस ठाण्यात शारीरिक व मानसिक छळाची तक्रार दिली. या तक्रारीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुशीर खान पठाण यांनी अटक न करण्यासाठी तक्रारदाराकडे 10 हजारांची मागणी केली होती.