जालना - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी केंद्र सरकारने अत्यावश्यक सेवा सोडून सर्वत्र लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे सगळ्यांचेच हाल होत आहेत. यातून मनुष्य पण सुटला नाही, तर मुक्या प्राण्यांचे तरी काय? असा सवाल उभा राहिला आहे. सध्या जालन्यामध्ये वानरांची एक टोळी अन्न-पाण्याच्या शोधात फिरत आहे. तर या वानरांना सुनील जाधव हे अन्नदान करत आहेत. त्यामुळे त्यांच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
शहरातील बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या हॉटेल इंद्रायणीच्या गच्चीवर एक वानरांची टोळी आली आहे. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे सर्व लोक घरातच आहेत. घरातून बाहेर येत नाहीत, त्यामुळे वानरांची टोळी अन्न-पाण्याच्या शोधात फिरत आहे. त्यावेळी या इंद्रायणी हॉटेलमध्ये काम करणारे सुनील जाधव या वानरांना अन्नदान करत आहेत. जाधव या वानरांना दररोज 150 ते 200 रुपयांची बिस्किटे खायला देतात. तर हॉटेलचे मालक विजय राऊत आणि विनोद राऊत हे देखील या खर्चामध्ये मदत करतात.
दरम्यान, लॉकडाऊनमुळे रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. कंपन्या- कारखाने बंद आहेत. उद्योगधंदे बंद असल्यामुळे प्रदूषणही कमी झाले आहे. या साऱ्या संकटाच्या काळात पक्षी मात्र मोकळा श्वास घेत आहेत. दिवसभर चिमण्यांचा चिवचिवाट, पक्ष्यांचा किलबिलाट जालन्यातील नागरिक अनुभवत आहेत.