जालना - मॉब लिंचींगप्रकरणी सायबर सेलने सोशल मीडियावर वॉच ठेवणे सुरू केले आहे. याबाबत सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई होईल. तसेच अॅडमिनसह ती पोस्ट टाकणाऱ्याचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी दिला आहे.
दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट सध्या व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, अशा सोशल मीडियावर फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. यामधून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने अशा पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीसह ज्या ग्रुपवर या पोस्ट आल्या आहेत, त्या ग्रुपच्या अॅडमिनलाही जबाबदार धरणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अशा अफवा पसरविणाऱ्या आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्या संदेशावर सायबर शाखेचे पोलीस विशेष लक्ष देत आहेत. त्यामुळे व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमिनने त्याच्या ग्रुपवर असलेल्या सदस्यांना योग्य त्या सूचना देण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.