बदनापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशात हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची उपासमार होत आहे. या परिस्थितीत बदनापूर येथील एक किराणा व्यावसायिक गरजूंच्या मदतीसाठी धावून आला आहे. त्यांनी आपल्या मूळ गावी धान्य, सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप केले.
बदनापूर तालुक्यातील पाडळी येथील भरत शेळके आणि त्यांच्या पत्नी अनिता शेळके बदनापूर येथे ओंकार किराणा म्हणून एक दुकान चालवतात. शेळके यांचे मूळ गाव पाडळी असून ते शेतकरी कुटुंबातील आहेत. सध्या कोरोनाचा प्रादूर्भाव थांबवण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये त्यांच्या मूळ गावी अनेक कामगारांची उपासमार होत असल्याचे त्यांना समजले. ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी धान्य व किराणा वस्तू थेट गावात घेऊन जात त्याचे वाटप केले.
प्रत्येक गरजूला 20 किलो गहू, दोन किलो हरभरा, एक लीटर तेल, मीठ, हळद, मिरची, मसाला, चहा पावडर, साखर याबरोबरच साबण, मास्क व सॅनिटायझर असे साहित्य वाटले. आपल्या गावाशी असलेला ऋणानुबंध जपत त्यांनी गावातील जवळपास 55 ते 59 गरजूंपर्यंत हे साहित्य पोहोचवले. बाजारभावाप्रमाणे एका किटची किंमत जवळपास 1000 रुपये झालेली होती. तरीही, त्यांनी खर्चाची चिंता न करता प्रत्येक कुटुंबाला 20 किलो धान्य व किमान पंधरा दिवस पुरेल इतके किराणा साहित्य वाटून आदर्श उभा केला आहे.