जालना - युती सरकारच्या काळात भूमिपूजन झालेल्या कुंडलिका नदीवरील पुलाचे बांधकाम आघाडी सरकारच्या काळात पूर्ण झाले आहे. परंतु याचे सर्व श्रेय हे भारतीय जनता पार्टीलाच मिळणार आहे. मात्र, त्यावेळेस झालेली भाजप आणि सेनेची दिलजमाई आता तुटलेली असल्यामुळे शिवसेनेने गनिमी कावा करत युवा सेनेच्या माध्यमातून भिमशक्तीला हाताशी धरून आज हा पूल वाहतुकीसाठी खुला करून दिला आहे.
लोखंडी पुलाच्या ठिकाणी बांधला नवीन पूल..
पावणे दोनशे वर्षांपूर्वी इंग्रजांनी या नदीवर एक पूल बांधला होता आणि तो पूर्णपणे लोखंडी असल्यामुळे लोखंडी पूल असे याचे नाव पडले होते. नवीन आणि जुना जालना यांना जोडणारा कुंडलिका नदीवरील हा महत्त्वाचा दुवा होता. दीडशे वर्ष पूर्ण झाल्यामुळे इंग्रज सरकारने या पुलाची मुदत संपल्याचे पत्र दहा वर्षांपूर्वीच जालना नगरपालिकेला पाठवले होते. त्या अनुषंगाने युती शासनाच्या काळात भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून या पुलासाठी भरीव निधी मिळाला आणि लोकसभा विधानसभेच्या तोंडावर या पुलाचे भूमिपूजनही झाले. वर्षभरात नंतर या पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली. सुमारे सात महिन्यांच्या कार्यकालानंतर हा पूल पूर्ण झाला आहे.
पूल ठरतोय वादग्रस्त..
सध्या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे आणि रंगरंगोटी अंतिम टप्प्यात आहे. त्याच दरम्यान मागील महिन्यामध्ये या पुलावर एका राजकीय पुढाऱ्यांचे नाव कोरले गेले होते. त्यामुळे भीमशक्तीने या नावाला विरोध करत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता या इशाऱ्यानंतर हे नाव पुसून टाकण्यात आले. गेल्या महिनाभरापासून पुलाचे काम पूर्ण झालेले असताना देखील तो सुरू होत नसल्यामुळे जालनेकर त्रस्त झाले होते. याच्या बाजूला असलेल्या छोट्या पुलावरून वाहतूक होती मात्र या पुलावर देखील मोठमोठे खड्डे पडल्यामुळे जीव मुठीत धरून चालावे लागत होते. अशा परिस्थितीमध्ये आज युवा सेनेचे नेते माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांचे चिरंजीव अभिमन्यू खोतकर यांनी भीमशक्तीच्या सुधाकर निकाळजे यांना सोबत घेऊन आज या पुलावर रस्त्यात टाकलेले अडथळे दूर करून पूल जालनेकरांसाठी वाहतुकीला सुरू करून दिला आहे.
पालिकेच्या हद्दीतील पूल..
हा पूल जरी सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधला असला तरी या पुलाची मालकी ही जालना नगरपालिकेची राहणार आहे. त्यामुळे बांधकाम झाल्यानंतर हा पूल जालना नगरपालिकेकडे हस्तांतरित होईल आणि त्यापुढील देखभाल-दुरुस्ती ही जालना पालिकेच्या असणार आहे. मात्र आत्ताच या पुलाच्या नाम करण्यापासून तक्रारींना सुरुवात झाली आहे, या पुलाच्या गुणवत्तेविषयी देखील प्रश्न उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे नगरपालिकेने हा पूल हस्तांतरित करून घेताना त्याची गुणवत्ता तपासून घेणे गरजेचे आहे.
काँग्रेसची बघ्याची भूमिका -
जालना नगरपालिकेत आमदार कैलास गोरंट्याल यांच्या काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. त्यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल या नगराध्यक्ष आहेत. आज भाजप आणि शिवसेनेतील या पुलाच्या वादासंदर्भात त्यांनी बघ्याची भूमिका घेतली आहे. या बद्दल कोणतेही भाष्य न करता त्यांचे नगरसेवक देखील इथे उपस्थित असताना कुठलाच प्रतिकार किंवा प्रतिसादही दिला नाही.