जालना - कोरोना रोगराईच्या प्रतिबंधासाठी लॉकडाऊन सुरू असल्यामुळे त्याचा फटका बदनापूर तालुक्यातील मेंढपाळांनाही बसत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा तालुका बंदी असल्यामुळे अनेक मेंढपाळांना एकाच ठिकाणी अडकून पडावे लागत असल्यामुळे मेंढ्यांरोबरच मेंढपाळांचीही उपासमार होण्याची शक्यता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनस्तरावर अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत जिल्हा बंदी करण्यात आलेली आहे. उन्हाळयाचे चार महिने शेकडो किलोमीटर दूर भटंकती करून मेंढ्यांबरोबरच आपल्या कुटुंबांचे पालन करणाऱया मेंढपाळांनाही याचा मोठा फटका असला आहे.
उन्हाळ्यात शेळ्या-मेंढयांना एका ठिकाणी खाण्यास उपलब्ध होत नसल्यामुळे हे मेंढपाळ मेंढ्यांचे कळप गावोगाव घेऊन फिरतात व या जनावरांबरोबरच संपूर्ण कुटुंबांचे बिऱ्हाडच चार महिने गावोगाव हिंडत असते. परंतु यंदा मात्र कोरोनामुळै जिल्हाबंदी झालेली असल्यामुळे या मेंढपाळांना जनावरांसह जेथे हेाते त्या एकाच गावात अडकून पडावे लागत आहे. याबाबत तालुक्यातील दाभाडी येथील राम खंबाट, गणेश पाटोळे, सोमठाणा येथील गजानन गायके, राजू मैद, ज्ञानेश्वर तोतरे, अप्पसाहेब कोल्हे, कडेगाव येथील अमोल बकाल, सुखदेव जोशी, ढासला येथील विष्णू डवणे, देवीदास डवणे हे दर उन्हाळ्यात चारा-पाण्याच्या शोधात मेंढ्यांसह गावोगाव फिरून या जनावरांचा व स्वत:च्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करत असतात. यंदा मात्र कोरोनामुळे जिल्हा बंदी असल्यामुळे त्यांना आहे त्याच जागी अडकून पडावे लागले आहे. त्यामुळे या जनावरांना काय खाऊ घालावे या चिंतेत हे मेंढपाळ असतानाच कुटुंबांचीही उपासमार होण्याची स्थिती आहे.
एकाच गावात असल्यामुळे दिवसभर रानावनात हिंडूनही चारा व पाणी मिळत नसल्याने मेंढरांचे व शेळ्यांचे काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. या शेळ्या मेंढ्यांना पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप निर्माण झाले आहे. याबाबत मल्हार सेनेचे तालुकाध्यक्ष गणेश कोल्हे यांनी तालुका प्रशासनाला निवेदन देऊन मेंढपाळांच्या समस्या कानावर घातल्या आहेत. या मेंढ्यांसाठी चारा छावणी व प्रत्येक मेंढपाळाला किमान 2000 रुपये प्रती महिना व प्रत्येक मेंढी 50 रूपये चाऱ्यासाठी अनुदान देण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
या निवेदनावर गणेश केाल्हे, जना सोरमारे, कृष्णा खरात, प्रभाकर जोशी, बाबासाहेब बनसोडे, बालाजी कानुले, संभाजी चांगुलपाये, सुधीर पवार, निवृत्ती देहडे आदींच्या स्वाक्षऱ्या होत्या. सध्या मेंढपाळाकडील शेळ्या-मेंढ्या ज्या गावात आहे त्याच गावातील मोकळ्या रानावनात अन्न शोधत आहेत तर काही ठिकाणी मेंढपाळ आपली मेंढरं-शेळ्या परिसरातील पाळीव प्राण्यांनी खाऊन शिल्लक राहिलेला चारा ते खात असल्याचे सध्याचे चित्र आहे