जालना - राज्यात संचाबंदी लागू करण्यात आली आहे. यामध्ये दारू सहजासहजी मिळणे बंद झाले आहे. याचा फायदा घेत जालन्यातील दोन भावांनी परतूर येथील दारूचे दुकान फोडले आणि येथून चोरलेली दारू जालना शहरात आणून चढ्या भावाने विक्री करीत असताना पोलिसांनी छापा मारला.
बाजार पोलीस अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना माहिती मिळाली, त्यानुसार त्यांनी विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रमेश रुपेकर यांचे एक पथक तयार करून तोतला पेट्रोल पंपाच्या पाठीमागे असलेल्या शेरसवार नगर येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा मारण्यात सांगितले. त्यानुसार रविवार दिनांक 18 रोजी या ठिकाणी छापा मारला असता विविध प्रकारच्या दारूचा साठा आढळला. एकूण एक लाख अकरा हजार 180 रुपयांचा हा दारूसाठा आढळला आहे.
परतूर येथील वाटूर फाटा रस्त्यावर असलेल्या श्री बियर बार येथे दिनांक 16 च्या रात्री विविध कंपन्यांच्या सुमारे एक लाख 53 हजार 380 रुपयांच्या दारूच्या बाटल्या चोरीला गेले असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. पांडुरंग बाबुराव सोनवणे यांनी ही तक्रार दिली होती.
दरम्यान, हा दारूसाठा सापडल्यानंतर पोलिसांनी या दारूसाठा बाबत शेख अमीर शेख साबीर 26 राहणार शेर सवारनगर याला विचारणा केली असता त्याने त्याच्या भावासह व इतर सहकाऱ्यांच्या मदतीने परतूर येथील बियर बारमध्ये चोरी करून हा साठा आणल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच सध्या बाजारामध्ये दारू मिळत नसल्याचे चढ्या भावाने देखील विक्री केल्याची कबुली शेख अमीर शेख साबेर यांनी दिली आहे.
हेही वाचा - कोरोनाबाधिताची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; वर्धा जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार