जालना - जिल्हा प्रशासनाने उत्तर प्रदेशमधील उन्नाव या स्थानकापर्यंत मंगळवारी दुसरी श्रमिक रेल्वे सोडली. मात्र, आवश्यक तितके प्रवासी नसल्याने सायंकाळी ६ वाजता सुटणारी रेल्वे ७ वाजता सुटली. तरीही प्रवासी मजूर कमी असल्याने रेल्वेचे पाच डबे रिकामेच गेले.
रविवार 10 मे रोजी पहिली रेल्वे उत्तर प्रदेशकडे रवाना झाली होती. त्यानंतरही अनेक कामगार जालन्यात अडकल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने या कामगारांची नोंदणी करून दुसऱ्या रेल्वेची तयारी केली. आज 1465 कामगार या रेल्वेने पाठवता येतील, अशा पद्धतीने जय्यत तयारी केली. मात्र, एवढे कामगार न मिळाल्यामुळे गावात फिरून या कामगारांना बोलावून आणावे लागले. तरीदेखील आवश्यक असलेले प्रवासी मिळाले नाहीत. त्यामुळे ६ वाजता सुटणारी रेल्वे हे प्रवाशांची वाट पाहत सात वाजता सोडावी लागली.
रेल्वे स्थानकावर देखील विविध संघटनांनी या कामगारांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली होती. मात्र, आवश्यक असलेले कामगारच कमी झाल्यामुळे विविध संस्थांनी बांधलेला अंदाज चुकला. सात वाजेच्या सुमारास ही रेल्वे हे गुजरातकडे रवाना झाल्यानंतर जालना नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने रेल्वे स्थानकांमध्ये निर्जंतुकीकरण रसायनाची फवारणी केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्थानक परिसरामध्ये आजही ही कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हा प्रशासनाच्या वतीने तहसीलदार श्रीकांत भुजबळ, पोलीस प्रशासनाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, बिनतारी संदेश यंत्रणाचे पोलीस निरीक्षक संजय व्यास, रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक त्रिपाठी, आदींची उपस्थिती होती.