जालना - सतीश भाऊ चिडू नका, असा प्रेमाचा, आपुलकीचा आणि राजकीय मैत्रीचा सल्ला राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. अर्थातच हा सल्ला दिला आहे तो मराठवाडा पदवीधर मतदार संघातून निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदार सतीश चव्हाण यांना. निमित्त होते आनंद फाउंडेशनच्या वतीने आमदार सतीश चव्हाण यांच्या जाहीर सत्काराचे.
शिक्षकांच्या घोषणा आणि चिडलेले आमदार चव्हाण -
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडली आणि आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला .या विजयानंतर जालन्यात साहित्य, कला आणि संस्कृती, क्षेत्रात काम करणाऱ्या आनंद फाउंडेशनच्या वतीने आमदार चव्हाण यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या सत्काराला उत्तर देताना सतीश चव्हाण उभे राहिले आणि काही वेळातच उपस्थित असलेल्या शिक्षकांनी घोषणाबाजी सुरू केली. या घोषणाबाजी दरम्यान आमदार चव्हाण यांनी या शिक्षकांसोबत केलेल्या हावभावांमुळे सभाग्रहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र थोड्याच वेळात ते निवळले. दरम्यानच्या काळात शिक्षकांनी त्यांच्या अडीअडचणी आणि प्रश्न सोडविण्याची मागणी ही आमदार चव्हाण यांच्याकडे केली.
सतीश भाऊ चिडू नका, लोकशाही आहे -
शिक्षक आणि आमदार सतीश चव्हाण यांच्या मधील समोरासमोर चाललेली चर्चा सर्व सभाग्रहा प्रमाणेच व्यासपीठावरील नेते मंडळी देखील बारकाईने पाहत होते. सतीश चव्हाण चिडलेले आहेत हे प्रकर्षाने सर्वांनाच जाणवत होते. त्यामुळे राजेश टोपे यांनी आमदार सतीश चव्हाण यांना निवडून आल्याबद्दल शुभेच्छाही दिल्या आणि त्यांचा सत्कारही केला. त्यासोबत एक प्रेमाचा, आपुलकीचा, माणुसकीचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राजकारणातील यशाचा सल्लाही दिला. ते म्हणाले" सतीश भाऊ चिडू नका, ही लोकशाही आहे, लोकांना अधिकार आहेत, त्यामुळे त्यांचे ऐकून घेतले पाहिजे. एवढे बोलल्यावर ऐकून घेतील त्यांना सतीश चव्हाण कोण म्हणेल? त्यांनी लगेच पलटवार करत म्हणाले, "भैय्यासाहेब मी चिडलो नाही, स्पष्ट बोललो हे तुमच्या वडिलांकडूनच शिकलो आहे" असे उत्तर मिळाले त्यामुळे आमदार टोपे यांनी देखील भाषण आटोपते घेतले आणि कार्यक्रम संपला.
अर्जुन खोतकर खोतकर गैरहजर -
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीचे उमेदवार म्हणून निवडून आलेल्या सतीश चव्हाण यांच्या सत्कार समारंभाला या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना बोलावण्यात आले होते. पत्रिकेवर आणि बॅनरवर अधिकृत छायाचित्रे देखील होती . असे असतानाही शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर हे या कार्यक्रमाला आले नाहीत. त्यामुळे उपस्थित असलेल्या या काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी खोतकर यांना चिमटे घेण्याची संधी सोडली नाही. आमदार सतीश चव्हाण यांनी देखील खोतकर यांचे नाव न घेता मते देणाऱ्यांपेक्षा मते फोडणाऱ्याला जास्त सांभाळावे लागते असे म्हणत टोला मारला. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष सुरेखा लहाने, काँग्रेसच्या विमल आगलावे , काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख, आनंद फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी मदन ,नारायण बोराडे, आदींची उपस्थिती होती.