जालना - सध्या सुरू असलेला जिल्हा सामान्य रुग्णालयाचे स्थलांतर सुरू झाले आहे. उद्यापासून गांधीचमन येथील स्त्री रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या जुन्या रुग्णालयाच्या इमारतीत रुग्ण तपासणी सुरू होणार आहे. कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सध्या असलेले जिल्हा सामान्य रुग्णालय पूर्ण रिकामे केले जाणार आहे. तसेच, सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांना नवीन जागेत स्थलांतरित करण्यात येणार आहे. उद्यापासून रुग्णांनी देखील याच रुग्णालयात यावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय कुलकर्णी यांनी केले आहे.
जालना जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात कोविड-19 हे नवीन हॉस्पिटल उभारले आहे. तसेच या रुग्णांची तपासणी करण्यासाठी देखील येथे प्रयोग शाळा आहे. त्यामुळे अशा रुग्णांना या हॉस्पिटलजवळ ठेवणे संयुक्तिक होणार असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने सध्या सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विविध विभागातील सुमारे पन्नास रुग्णांना उद्या नवीन जागेत पाठवण्यात येणार आहे.
हेही वाचा - दु:खाचा डोंगर..! अवघ्या 9 दिवसात सख्ख्या तीन भावांचा कोरोनामुळे मृत्यू
पूर्वी ज्या ठिकाणी महिला रुग्णालय होते, त्या जुन्या महिला रुग्णालयाच्या इमारतीमध्ये आता हे रुग्णालय स्थलांतरित करण्यात येणार आहे. आज अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय कुलकर्णी, डॉ. मधुकर राठोड यांच्यासह स्टाफ नर्स यांनी या ठिकाणची पाहणी केली. सध्या या इमारतीमधील विजेची कामे, स्वच्छतेची कामे, नळ दुरुस्ती ही कामे सुरू आहेत. यासोबत सांडपाण्याचा पुनर्वापर करता यावा, यासाठी इथे नवीन मशनरी बसवण्यात येत आहे. हे पाणी बगीच्यासाठी वापरण्यात येऊ शकते.