जालना - स्वच्छ भारत अभियान अंतर्गतच्या कामात निष्काळजी केल्याप्रकरणी जिल्ह्यातील 138 ग्रामसेवकांवर कारवाई करून त्यांच्या दोन वेतनवाढी प्रशासनाने थांबविल्या आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या जालना शाखेने बुधवारी जिल्हा परिषदेत आंदोलन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांच्यासोबत या युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी दोन तास चर्चा केली. ज्या ग्रामसेवकांवर कार्यवाही झाली त्यांची पुन्हा चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन अरोरा यांनी दिले. परंतु यावर ग्रामसेवकांचे समाधान न झाल्याने स्वच्छ भारत अभियानाच्या कामांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.
ग्रामसेवकांवर जिल्हा परिषदेने केलेली ही कारवाई लक्षात घेता या युनियनने दिनांक 25 जून पासून स्वच्छ भारत अभियानांतर्गत असलेल्या सर्व कामांवर बहिष्कार टाकला आहे. त्यासंदर्भात प्रशासनाला पत्रही दिले होते. असे असताना देखील प्रशासन आढावा बैठक लावत आहे. त्यामुळे प्रशासनाने जोपर्यंत या ग्रामसेवकांचा निर्णय लागत नाही तोपर्यंत कुठल्याही बैठकीला ग्रामसेवक हजर राहणार नसल्याचे आज पुन्हा प्रशासनाच्या लक्षात आणून दिले.
या बैठकीला महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे जालना शाखेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पवार, सरचिटणीस दत्ता मानकर यांच्यासह पंकज ढाकणे तसेच युनियनचे पदाधिकारी आणि ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.