जालना - येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाप्रमाणे राज्यातील 200 खाटांपेक्षा जास्त संख्या असलेल्या सर्व रुग्णालयांमध्ये "लिक्विड ऑक्सिजन"चा जालना पॅटर्न राबवण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. जुन्या सामान्य रुग्णालयातील जनरल वॉर्डमध्ये आयसीयू सुविधा असणाऱ्या ४० खाटांच्या कक्षाचे उद्घाटन आज टोपे यांच्या हस्ते करण्यात आले.
ज्या सामान्य रुग्णालयात २०० खाटांची व्यवस्था आहे, अशा सर्व रुग्णालयांना लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी प्लांट उभे करण्याच्या सूचना केल्या आहेत. यासाठी लागणार निधी जिल्हा विकास व नियोजनमधून घ्यावा किंवा आरोग्य विभागही यासाठी निधी पुरवेल. ऑक्सिजनची मागणी वाढल्यामुळे आता जुन्या परिस्थितीवर अवलंबून न राहता जालन्याचा हा पॅटर्न सर्वत्र राबविला जाणार आहे, असे राजेश टोपे यांनी म्हटले. यावेळी आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक प्रताप घोडके, डॉ. संजय कुलकर्णी, आदींची यावेळी उपस्थिती होती.
हेही वाचा-फवारणी करताना विषबाधा झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
अनेक वेळा मृतदेह काही दिवस रुग्णालयातही ठेवावा लागतो, तो ठेवण्याचीही व्यवस्था आता करण्यात आली आहे. त्यासोबत रुग्णांच्या नातेवाइकांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी धर्मशाळा देखील सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेविषयी 8 दिवसानंतर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. कोरोनाच्या रुग्णांना याचा कसा फायदा देता येईल, यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचेही आरोग्य मंत्री टोपे म्हणाले.