जालना : Raj Thackeray Met Maratha Protestors : मराठा आंदोलन सध्या पेटलं आहे. जालना येथे मराठा आंदोलकांवर 1 सप्टेंबरला पोलिसांनी लाठीचार्ज केला (Lathicharge on Maratha Protestor in Jalna) होता. यामध्ये आंदोलकांसह अनेक पोलीसही जखमी झाले होते. मराठा आरक्षण मुद्द्यावरुन आता राजकारण तापलं (Politics on Maratha Reservation) आहे. मराठा आंदोलकांची भेट घेण्यासाठी आता राजकीय नेत्यांची रीघ लागली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आंदोलकांची जालना येथे भेट घेतली.
नेत्यांना मराठवाड्यात येऊ देऊ नका - आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्यांना मराठवाड्यात येऊ देऊ नका. नेते तुमची मतं मागतात आणि तुम्हाला वाऱ्यावर सोडून जातात. ज्या नेत्यांनी लाठीचार्ज करण्याचे आणि आंदोलकांना बंदुकीच्या धाकावर रोखण्याचे आदेश दिले, त्यांना आंदोलकांनी मराठवाड्यात येऊ देऊ नये, असे आवाहन आंदोलकांना करत राज ठाकरे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. तसेच जोपर्यंत नेते माफी मागत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवावे, असेही ते म्हणाले.
राजकारण्यांच्या विनाकारण नादी लागू नका. तुमच्या घोषणांनीच सरकारनं तुम्हाला वेडं केलं आणि रस्त्यावर आणलं. या लोकांना तुमची फक्त मतं पाहिजेत. तुमच्यासाठी काही करायचं नाही - राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
ताफा अडवून दिलं निवेदन - राज ठाकरे मराठा आंदोलकांची भेट घेण्यासाठी जालना येथे जात होते. मात्र, तिथे जाण्याआधीच त्यांचा ताफा एका ठिकाणी मराठा आंदोलकांनी अडवला. तसेच राज ठाकरे यांच्यासमोर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलकांनी राज ठाकरे यांना निवेदन दिले. यावेळी राज ठाकरे यांनी आंदोलकांना मार्गदर्शन करताना राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
राज ठाकरेंचा आंदोलनाला पाठिंबा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी मराठा आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. राज ठाकरे यांनी फोनवरून आंदोलकांशी संवाद साधला. आमचा या आंदोलनाला पाठिंबा आहे, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही रविवारी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केलाय. त्यानंतर आज (4 सप्टेंबर) स्वत: राज ठाकरे हे जालन्यात दाखल होत मराठा आंदोलकांची भेट घेतली.
आंदोलकांची भेट घेण्यासाठी राजकीय नेत्यांची रांग : शनिवारी शरद पवार यांनी लाठीचार्जदरम्यान जखमी झालेल्या आंदोलकांची भेट घेतली. घडलेला हा प्रकार अत्यंत गंभीर असून, पोलिसांना लाठीचार्जची ऑर्डर मुंबईवरून देण्यात आली होती, असा आरोप शरद पवार यांनी केलाय. तसेच शनिवारी (2 सप्टेंबर) उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी मराठा आंदोलकांची जालना येथे जाऊन भेट घेतली होती. लाठीचार्ज करण्यासाठी मंत्रालयातून आलेला तो अदृश्य फोन कॉल कोणाचा होता? असा सवाल संजय राऊत यांनी राज्य सरकारला विचारला होता. तसेच छत्रपती संभाजीराजे आणि खासदार उदयनराजे भोसले यांनीही जालना येथे येऊन मराठा आंदोलकांची भेट घेतली.
मराठा आंदोलन मुद्दा तापला : जालना येथील गावात काही मराठा बांधव आरक्षणाच्या मुद्द्यासाठी उपोषणाला बसले होते. हे आंदोलन सुरू असतानाच अचानक 1 सप्टेंबरला दगडफेक झाली. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला होता. यात अनेक आंदोलक आणि पोलीसही जखमी झाले होते.
हेही वाचा -