जालना - आत्तापर्यंत कोरोना बाधित रुग्णांचा प्रश्न गंभीर होता. परंतु आता आणखी एक गंभीर समस्या समोर येत आहे. ती या रुग्णांच्या नातेवाईकांची. सामान्य रुग्णालयात सुरू असलेल्या कोविड रूग्णालयाच्यासमोर रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी होत आहे. कदाचित यामधून देखील हा आजार आणखी पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नेमका हाच मुद्दा ग्राह्य धरून या नातेवाईकांच्या निवाऱ्याची व्यवस्था काही संस्थांच्या माध्यमातून विनामूल्य करण्यात येत आहे.
नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गर्दी-
सामान्य रुग्णालयामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातसोबत रुग्णांचे नातेवाईक देखील वाढत आहेत. एका रुग्णासोबत ग्रामीण भागातून किमान दोन ते तीन नातेवाईक येथे ठाण मांडून आहेत. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या गर्दीमुळे हा आजार पुन्हा पसरण्याची शक्यता आहे. रुग्णांपर्यंत पोहोचणे धोकादायक असली तरी नातेवाईक आपल्या रक्ताचं नातं जोपासत कुठल्या न कुठल्या तरी पद्धतीने या रुग्णासोबत संवाद साधण्याचा किंवा प्रत्यक्ष भेटण्याचा प्रयत्न करीत आहेत.
रुग्णांच्या नातेवाईकांसाठी राजकीय पक्ष देखील पुढे सरसावले-
या गर्दीला आळा घालण्यासाठी आणि ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना निवारा मिळावा या हेतूने या हॉस्पिटलच्या बाहेरच बी.पी. इंग्लिश स्कूल आणि एका खासगी मालकाचे बांधकाम निवारासाठी घेण्याचे निश्चित झाले आहे. या सर्व परिस्थितीवर आणि नियोजनाची जबाबदारी घेणारे मनोज देशमुख ही सर्व व्यवस्था पाहत आहेत. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांसाठी राजकीय पक्ष देखील पुढे सरसावला आहेत. प्रभाग क्रमांक 26 मध्ये हे हॉस्पिटल येत असल्यामुळे नगरसेवक शशिकांत घुगे यांनी देखील पक्षाच्यावतीने हॉस्पिटलच्या बाहेरच रुग्णांच्या नातेवाईकांना थांबण्यासाठी तसेच पोलिसांसाठी निवाऱ्याची, पाण्याची व्यवस्था केली आहे. या व्यवस्थेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा मनोज देशमुख आणि शशिकांत घुगे यांनी व्यक्त केली आहे.
ग्रामीण भागातून येणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांनी अशा रुग्णांना तालुका स्तरावर असलेल्या कोवीड रुग्णालयातच भरती करावे, आणि होणारी गैरसोय टाळावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विवेक खतगावकर यांनी केले आहे.
हेही वाचा- देशात लसीकरण वाढवणे गरजेचे; माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे मोदींना पत्र