जालना - साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेला अक्षय्य तृतीयाचा सण असल्याने नागरिकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती. रविवार असल्यामुळे भाजीपाला विक्रेत्यांची बाजारात मोठी गर्दी होती.
सध्या लॉकडाऊन तसेच जमावबंदी देखील लागू आहे. त्यामुळे एका ठिकाणी आणि सामाजिक अंतर ठेवूनच काही जणांना एकत्र येता येते. मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसवून आज बाजारामध्ये प्रचंड गर्दी होती. तसेच अक्षय्य तृतीया असल्याने जलदान करण्यासाठी लागणाऱ्या केळी खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. जन्या जालन्यातील गांधीचमन येथे नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये देखील आंबे खरेदी विक्री, मोसंबी, टरबूज यांची मोठी उलाढाल झाली. या खरेदी विक्रीलाही ही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दीवर कोणाचेही नियंत्रण नव्हते. हे नियंत्रण ठेवायचे कोणी? असा प्रश्नही निर्माण झाला आहे. बाजार समितीत स्वस्त भाजीपाला मिळत असल्यामुळे गर्दी होते. बाजार समिती वगळता गावांमध्ये फिरणाऱ्या हातगाड्या आणि विविध ठिकाणी भाजीपाल्याची दुकाने आणि बाजार समितीमध्ये मिळणारे भाज्यांचे भाव यामध्ये फार मोठा फरक आहे. त्यामुळे किरकोळ खरेदीसाठी देखील ग्राहक बाजार समितीमध्ये जात आहेत.
बाजार समितीमध्ये भाज्यांचे असे आहेत भाव -
टोमॅटो, कैरी , शेवग्याच्या शेंगा , गवार, भेंडी, या सर्व भाज्या दहा रुपये किलोने मिळत आहेत.
याच भाज्या दारावर घेतल्यानंतर 40 रुपये किलोने मिळत असल्यामुळे नागरिक थेट बाजार समितीमध्ये जाऊन भाज्या खरेदी करत आहेत.