जालना - हातात कोयता धरून ऊस तोडणाऱ्या, रोजगार हमी योजनेच्या कामात कामावर खड्डे खोदणाऱ्या आणि मिळेल ते काम करणाऱ्या कुटुंबाने रक्ताचे पाणी करुन शाळा शिकवलेली मुलगी आज पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) झाली. लहानपणी हातात आलेल्या कोयत्यानेच तिला जीवनाचा संघर्ष शिकवला आणि याच कोयत्याने तिचे जीवन बदलून टाकले. त्यामुळे आजही त्या कोयत्यासोबतचा तिचा लळा सुटलेला नाही.
जालन्यात "कोयता एक संघर्ष " या चित्रपटाचे प्रमोशन पीएसआय पल्लवी जाधव यांच्या हस्ते झाले. या कोयत्यावाल्याच्या पोरीचे म्हणजेच पल्लवी जाधवचे कोयत्याच्या आठवणी सांगताना डोळे भरून आले.
'कोयता एक संघर्ष' यानिमित्ताने आज पल्लवी जाधव यांच्या उपस्थितीत या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले. यावेळी चित्रपट कलाकार रमेश राज, अभिनेत्री प्रियंका मलशेट्टी ,श्री मसवाल यांचीही उपस्थिती होती.
कोयत्याशी असलेली जवळीक सांगताना पल्लवीच्या डोळ्यातील पाणी त्यांना लपवता आले नाही. त्या म्हणाल्या "माझ्यासाठी आई-वडिलांनी घेतलेले काबाड कष्ट हे मी शेवटपर्यंत विसरणार नाही, एवढेच नव्हे तर कदाचित माझ्या जोडीदाराला माझे आई-वडील माझ्यासोबत राहणे जर जमत नसेल तर मीदेखील अशा जोडीच्या जोडीदाराचा विचार करणार नाही."
फक्त पोलीस प्रशासनातच गुंतून न पडता अंगातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठीही पल्लवी जाधव नेहमीच प्रयत्नशील आहेत. कामातील आणि अभिनयातील चूनुक दाखविण्यासाठी अभिनयाची आवड असल्यामुळे लवकरच येऊ घातलेल्या "प्रेमात पेटलं मन सार" या चित्रपटात देखील त्यांनी काम केले आहे. त्यासोबत " फोरजी" या चित्रपटाचा देखील ऑडिशन झाला असून कॉलेजच्या 4 मुलींच्या गँगची लीडर म्हणून काम देखील त्या करीत आहेत.
या डॅशिंग अभिनयाने त्या कट्टे बहाद्दर मुलांना वठणीवर कसे आणतात. हे देखील चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुलींची लीडरशिप करणारी ही मुलगी सध्या जालना पोलीस प्रशासनामध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करीत असून अप्पर पोलीस अधीक्षक पदापर्यंत मजल मारण्याची त्यांची तयारी आहे.